व्यर्थ देवा जन्मा आलें । सौख्याते नाही देखीलें ॥ तिळभरी ॥धृ०॥
ना केली तुझी हो सेवा । हेम दुःखची होतें जीवा ॥ निशिदिनीं॥
ना केलें तुझें म्या ध्यान । नष्ट पापीष्ट मी हीन ॥ बहु असे ॥
ना अतीथाप्रती भोजन । ना दुबळ्यासिही दान ॥ कधी दिलें ॥चाल ॥
ना दया ती, कधी ना शांती, बसेना एकांतीं । ना संत समागम केला, समागम केला ।
परकार्या देह झिजविला ॥ ना कधी ॥व्यर्थ० ॥१॥
ना स्वार्थ ना परमार्थ । आयुष्य गेलें व्यर्थ ॥
निघुनी हें ॥ ना धर्म शास्त्र ना पाही ।
कधी किर्तनीं बसलें नाही ॥ क्षणभरी ॥
ना जप तप ना कांही । ना तीर्थ व्रत ना पाही ॥मुळीच मी॥चाल॥
कितीतरी, दोष मम भारी, बुडतें संसारीं ॥ तारी श्रीहरी तारी श्रीहरी ।
विनवितें बहुत परी ॥ दीन मी ॥व्यर्थ० ॥२॥
मायबाप बंधु बहीण । ना तारक तुजविण ॥कोणीही ॥
पतिपुत्र धन कन्या ती । हीं सर्व जीवाला भ्रांती ॥ वाटतें ॥
ही आप्त गोत्र सोयरी । बुडविती भवसागरीं ॥सर्वही॥चाल ॥
यांतुनी, मुक्त करुनी, त्वरें घेवुनी । जाई तव सदनी, जाई तव सदनीं ।
विनवितें नम्र होवुनी ॥ माधवा ॥ व्यर्थ० ॥३॥
माऊली अससी दिनासी । मजविषयी कसा निजलासी ॥माधवा॥
भक्तवत्सल ब्रीद हें चरणीं । तें दिलें काय सोडुनी ॥माधवा ॥
का पतीत पापी म्हणुनी । येईना करुणा अजुनी ॥माधवा ॥चाल ॥
तरी पतीत, पावन करीत, किर्ती गर्जत । असे त्रिभुवनीं असे त्रिभुवनीं ।
कां अंत पाहसी अजुनी ॥ माधवा ॥ व्यर्थ० ॥४॥
ऐसे हें करुनी स्तवन । येतसे बहुत रुदन ॥माधवा॥
अश्रुने भरले नयन । जातसें हृदय भेदुन ॥माधवा ॥
न येसी जरी धावुन । तरी चरणीं देह अर्पिन ॥माधवा ॥
चाल ॥ ह्या संसारीं, दुःख झालें भारी, प्रार्थीतें हरी ।
येई कंसारी येई कंसारी । उद्धरी तव करी वारी ॥माधवा ॥व्यर्थ ॥५॥