तुझ्या वृत्तीला तूंची बा आवरावें । काय म्यां पामरें सावरावें ॥धृ०॥
येई बा श्रीहरी । धावुनी लवकरी । वृत्तीला झडकरी ।
स्वरुपीं न्यावें । तुझ्या वृत्तीला० ॥१॥
दावुनी स्वरुपातें शांतवी वृत्तीते । तरीच मग सुखातें ।
सहज पावें । तुझ्या वृत्तीला० ॥२॥
मागुती ती कदा । पावेन आपदा । राहतां निजपदा ।
सौख्य लाहे । तुझ्या वृत्तीला० ॥३॥
कठीण अती कामना । नावरे तुजविणा ।
तोडी मनमोहना । वेगी धावे । तुझ्या वृत्तीला० ॥४॥
प्रार्थीतें तुजप्रती । नम्र होवुनी अती ।
वारीची पदीं मती । दृढ भावें । तुझ्या वृत्तीला० ॥५॥