वासुदेव रे हरी गोविंदा । देवकीतनया परमानंदा । वासुदेव रे ॥धृ०॥
सर्वां ठायीं वास असे परी । हृदयीं देशी तूं स्वानंदा ।
भक्त तुझें हें नामची गातां । देशी मोद प्रमोदा ।
वासुदेव रे हरी गोविंदा० ॥१॥
नामाचा तव अघटीत महिमा । मुक्त करीसी पशू गजेंद्रा ।
पापी अजमिळ गणीका नामे । नेसी आपुल्या मोक्षपदा ।
वासुदेव रे हरी गोविंदा० ॥२॥
नाम तुझें हें गोड अती रे । लागलें निशिदिनीं त्याच्या छंदा ।
विषय सुख हें गोड लागेना । सोडीला संसार धंदा । वासुदेव रे० ॥३॥
रामकृष्ण हरी प्रेमें गातां । त्या गृहीं राहसी नित्य मुकुंदा ।
वैकुंठीं मी राहातची नाही । सांगसी ऐसे त्या नारदा । वासुदेव रे० ॥४॥
वारी म्हणे हें नामची दिव्य । करी कर्माचा समूळ चेंदा ।
जन्ममृत्यू हे दूर करुनी । देईल ब्रम्हानंदा । वासुदेव रे० ॥५॥