करी दया, करी दया । हरुनी भवभया ।
दावी तव पाया । कृष्णराया ।
करी कृपा-दिनावरी सदया ॥धृ०॥
तव कृपेवांचुनी अन्य । साधनें शून्य ।
कृष्णनाथा । शिणावें कायसा वृथा ।
जरी केलें जपतप ध्यान । जाहलें ज्ञान ।
त्रिभुवनीचें. । तरी कायसें सौख्य त्याचें ॥चाल॥
जव झाली नाही तव कृपा । हो तव कृपा ।
तव ज्ञान सर्व तें फुका । हो फुका ।
चुकेना चौर्यांशीच्या खेपा । हो खेपा ॥चा.पू.॥
ह्यासाठी जावुनी शरण । धरुं दृढ चरण ।
नित्य श्रीहरीचे । संपादुं प्रेम हो त्यांचें । करी दया० ॥१॥
त्यागुनि विषय विरक्त । होवुं या भक्त ।
सदा श्रीहरीचे । पाळुनी नेम हो त्यांचे ।
ते नेम सांगे वेदांत । करा मन शांत ।
त्यागुनी बीज वासनेचें । तें ऐकुनी घ्याहो ।प्रेमे त्यांचें ॥चाल ॥
तें साधन असे हो थोडें । हो थोडें ।
मन कदा न वृत्तींत बुडे । हो बुडे ।
त्या संसारांतुनी उडे । हो उडे ॥चा.पू.॥
यासाठी करा भजन । अखंड नाम ।
घ्या हो श्रीहरीचें । मूळ असें हेंचि शांतीचें ।करी दया०॥२॥
बाणता शांती ती जाण । कृपेची खूण ।
हीच श्रीहरीची । तेथे उणीव नाही सौख्याची ।
मग काय कमी त्रिभुवनीं । हात जोडुनी ।
अष्ट सिद्धी । अंकीत त्याच्या विधी ॥चाल॥
त्यासाठी सोडी अहंपणा । हो अहंपणा ।
भक्तीविण साध्य न कोणा । हो कोणा ।
अर्षी त्या तन मन धना । हो धना ॥चा.पू.॥
प्रेमाने करीता भक्ति । देई हरी मुक्ति ।
दीनजना । लीन झाली वारी त्याहो चरणा । करी दया० ॥३॥