चटक लागली तुझीरे कृष्णा । तळमळतो जीव अंतरीं ।
आनंदाची मूर्ति मनोहर । पाहीन कधीतरी डोळेभरी ॥धृ०॥
कांही सुचेना विषय रुचेना । प्राण होती व्याकुळ भारी ।
तव विरहाने मन हें माझें । वेडें झालें गिरीधारी ।
चटक लागली तुझीरे कृष्णा० ॥१॥
कुठे दडाला नंदकुमारा । शोधूं कुठे ह्या वनांतरीं ।
पंचकोश हे शोधुनी थकलें । सांपडसीना तेथवरी ।
चटक लागली तुझीरे कृष्णा० ॥२॥
त्रिभुवन सारें धुंडुनी आलें ।
पुराणशास्त्रें परोपरी । अंत न लागे निवांत बैसुनी ।
पाहियलें हृदयांतरी । चटक लागली तुझीरे कृष्णा० ॥३॥
सद्गुरुकृपें अंत लागला । सांपडला हृदयांतरीं ।
अंतर बाहेर एकची भरला । वारी म्हणे हा चराचरीं ।
चटक लागली तुझीरे कृष्णा० ॥४॥