देवा कधीहो येणार । कां करिता हो उशीर ॥धृ०॥
किती वाट पाहूं हो तरी । तळमळतो जीव हा भारी ।
या आता हो लवकरी । केव्हा तरी येणार । देवा० ॥१॥
किती हांका मारुं देवा । घेवुनी सहस्त्र नांवा ।
करीते मी तुमचा धावा । करुणा येवुं दे लवकर । देवा० ॥२॥
घोडयावर बसुनी येई । दीन दुबळे भक्त पाही ।
अनन्य शरण पायीं । करी त्यांचा हो उद्धार । देवा० ॥३॥
तुज भजनाची आवड । रामकृष्ण नाम तुझें गोड ।
प्रेमें गावुनी पुरवीन कोड । करी कृपा वारीवर । देवा० ॥४॥