माझ्या सख्या हरीरे तूं सागर मी लहरीरे ॥धृ०॥
तूं जरी होशील देव । तरी मी भक्त एकची भाव ।
माझ्या सख्या हरीरे तूं० ॥१॥
तूं जरी होशील बारे सोनें । त्यावर होईन मी भूषणें ।
माझ्या सख्या हरीरे तूं० ॥२॥
तूं जरी श्रीहरी होशील मोती । तरी मी शिंपी होईन निश्चिती ।
माझ्या सख्या हरीरे तूं० ॥३॥
तूं जरी होशील सुत । तरी मी पट होवुनी राहीन त्यांत ।
माझ्या सख्या हरीरे तूं० ॥४॥
तूं जरी होशील जीवन । तरी मी तरंग होईन ।
माझ्या सख्या हरीरे तूं० ॥५॥
तूं जरी होशील माती । त्यावरी होईन मी घटाकृती ।
माझ्या सख्या हरीरे तूं० ॥६॥
तूं जरी होशील अग्नी । राहील ज्वाला मी होवुनी ।
माझ्या सख्या हरीरे तूं० ॥७॥
तूं जरी होशील पुरुष । तरी मी प्रकृती होईन खास ।
माझ्या सख्या हरीरे तूं० ॥८॥
तूं जरी होशील गगन । त्यांत मी वायूची झुळक होईन ।
माझ्या सख्या हरीरे तूं० ॥९॥
जरी तूं म्हणशील असे मी निर्गुण । तरी वारी त्यांतची जाईल मिळुन ।
माझ्या सख्या हरीरे तूं० ॥१०॥