प्रेम देई प्रेम देवा प्रेम मज देई ।
प्रेमाविण हरी तुझें दुजें नको काही ।
प्रेम देई प्रेम देवा० ॥धृ०॥
प्रेमासाठी देवा तुझ्या असेरे भुकेलें ।
प्रेमसुखावांचुनी मन माझेरें सुकलें । प्रेम देई० ॥१॥
नामस्मरणीं मन माझें सतत रंगोदे ।
प्रेमरस पिवुनीया सदारे गुंगोदे । प्रेम देई० ॥२॥
सदा तुझ्या ध्यानीं मन कदा न भंगावें ।
तदाकार होवुनीया त्यांतची रंगावें ।प्रेम देई० ॥३॥
प्रेमरंगीं रंगुनीया वृत्ती ही मुरावी ।
स्वस्वरुपीं ऐक्य होतां त्यांतची विरावी ।प्रेम देई० ॥४॥
ऐशा अद्वैत प्रेमाची आवड मज भारी ।
देवुनीया ऐशा प्रेमा तृप्त करी वारी ।प्रेम देई० ॥५॥