प्रेमाचा भुकेला अससी जरी तूं देवा ।
मी प्रेमरुप होईन भुकेचा मेवा ॥धृ०॥
ज्या वेळीं होईल ज्याची तुला आवड ।
त्या वेळीं होईन तीच वस्तु मी जड ।
जें करितां लागेल हरीरे तुजला गोड ।
तें करीन अखंडची नाही दुजी मज चाड ॥चाल॥
तुज भक्ति देवा फार आवडे । विभक्त न राहे कदा तुजपुढे ।
प्रेमाने गाईन तुझे पोवाडे ॥चा०पू०॥
प्रेमाचें स्थान त्या धरुनी राहीन दृढ भावा ।
प्रेमाने करीन मी नित्य हरी तुझी सेवा ।प्रेमाचा भुकेला० ॥१॥
तूं प्रेमास्तव हें सगुणरुप हरी झाला ।
प्रेमाचा पुतळा तुज भक्ताने बनविला ।
मग काय कमी तुज प्रेम मजसी द्यायाला ।
ही तुझीच वस्तू कां न द्यावी मी तुजला ॥चाल॥
अभिलाष बुद्धी ही नको मजप्रती ।
मी आहे तुझी ऐक्य भक्ति ती ।
मम हृदयी ठेवीन नित्य तुजप्रती ॥चा०पू०॥
प्रेमाने आर्त तूं बाह्य करीन मी सेवा ।
प्रेमाने घेईन लक्ष लावुनी नांवा ।प्रेमाचा भुकेला० ॥२॥
आजवरी विसरले होतें तुझ्या नांवाला ।
म्हणुनिया वाटीलें प्रेम विषयीं लोकाला ।
तूं भोक्ता त्याचा ठावुक नव्हतें मजला ।
म्हणुनीया ओघ हा होता तिकडे वळला ॥चाल॥
आकाशीं मेघ ते जैसे वोळले । पाहाडाते फोडुनी वेगे चालले ।
सागरीं मिळतां ऐक्य जाहलें ॥चा.पू.॥
प्रेमाचा ओघ हा चित्सागरी मिळवावा ।
वारीचा भाव हा जाणुनी देवा घ्यावा ।
प्रेमाचा भुकेला अससी जरी तूं देवा० ॥३॥