यदुराया तुम्ही थोर म्हणुनी । धरीलें दृढ चरणाला हो ॥देवा॥
धरीलें दृढ चरणाला हो । यदुराया तुम्ही थोर म्हणुनी ॥धृ.॥
श्रीमंताच्या घरचें हो श्वान । त्यासी अवघे देती मान ।
तैसी मी तुमची दासी दीन । ठेवा चरणापाशी हो । यदुराया० ॥१॥
लक्ष्मी असतां पायापाशी । द्याया उणें काय याचकासी ।
ऐसें असतां हृषीकेशी । प्रेमें भिक्षा कां द्याना हो । यदुराया० ॥२॥
पतीतालाहो पावन करिता । ऐसी ऐकिली शास्त्रीं वार्ता ।
तें ब्रीद आजि कां सोडुनी देतां । सत्यची कां आज सरलें हो । यदुराया० ॥३॥
भक्तवत्सल नाम हें असतां । कां धरीली हो आजी निष्ठुरता ।
प्रगट करुनी दीन वत्सलता । वारीसी घ्या आता पदरीं हो ।यदुराया० ॥४॥