देवा कशाला मजला । दाविलें ह्या द्वैताला ॥धृ०॥
मी एक होतें एकटी । तेथे केली कांही त्रिपुटी ।
लाविले गुण ते पाठी । तेणें बांधिलें मजला । देवा० ॥१॥
तेथें सुंदर होती नार । ती तरुण, सगुण चतुर ।
बांधिलें तिने हो घर । नऊ दरवाजे हो त्याला । देवा० ॥२॥
त्या घरांत बहु परीवार । ती छळीती वारंवार ।
दाविती विषय ते फार । तेणें दुःख होईअ मला । देवा० ॥३॥
आता कृपा करी लवकर । हा निर्दाळी परीवार ।
वाढला असे हा फार । तो वेष्टी त्रैलोक्याला ।देवा० ॥४॥
मी एकटीच असे बरी । एकांत कांत तूं हरी ।
स्वानंद भोगीतें भारी । आवड त्याची वारीला । देवा० ॥५॥