घनश्याम श्रीहरी सावळा । आठवुं वेळोवेळा गे ॥धृ०॥
कृष्ण कृष्ण हें मुखारविंदें । गावुनी नाचुं प्रेमानंदे ।
तल्लीन होवूं आत्मानंदे । नित्य हरीला ध्यावूं गे ॥सये॥
घनश्याम श्रीहरी सावळा० ॥१॥
त्यागुनी सर्वही संसारधंदा । शरण रिघूं हरी पदारविंदा ।
पाहूं सुंदर त्या गोविंदा । हृदयीं सदा प्रभू ठेवूं गे ॥सये ॥
घनश्याम श्रीहरी सावळा० ॥२॥
गावुनी ध्यावुनी हृदयीं पाहुनी ।
बांधू हरीला प्रेमभक्तिनी ।
तन मन धन हें सर्व अर्पुनी । लीन पदीं त्या होवूं गे ॥सये॥
घनश्याम श्रीहरी सावळा० ॥३॥
भक्तवत्सल तो जगजेठी । साठवुं आपुल्या हृदय संपुष्टी ।
अक्षयीं दृढ पदीं घालुनी मिठी । तें पद वारी न सोडी गे ॥सये ॥
घनश्याम श्रीहरी सावळा० ॥४॥