मी एक असुनी द्वैतभाव कां झाला ।
मज खचित वाटतें मायेने हा केला ॥धृ०॥
जरी विवेक विचारे द्वैतालां काढिलें ।
तरी कल्पनेचें बंड असें वाढलें ।
यासाठी नको ते विवेक विचार कांही ।
ती भक्ति प्रेमा देवा मजला देई ॥चाल॥
त्या भक्तिसुखांत वृत्ती विरते ।
मग द्वैतभाव मुळी नुरे ते ॥चा.पू.॥
ह्यासाठी चौथी भक्ति देई हो मजला ।
त्या भजनानंदीं समूळ जाई द्वैताला ।
मी एक असुनी० ॥१॥
तव नामाचा ह्या धाक असे मायेला ।
हरी नाम घेता स्पर्श न करी ती त्याला ।
विस्मृतीमुळे हें केलें तिने द्वैताला ।
त्यामुळे जीव हा बंधनांतची पडला ॥चाल॥
तो भक्तिवांचुनी सुटेना कदा ।
जो स्वानंदातची राहे हो सदा ॥चा.पू.॥
तीथें माया द्वैत स्पर्शेना मुळी त्याला ।
हा पंथ म्हणुनी वारीला हो गमला । मी एक असुनी० ॥२॥