तव पदीं विनंती असे एकची सद्गुरुनाथा ।
तव स्वरुपावांचुनी विषय दिसो न सर्वथा ॥धृ०॥
वृत्ती मम ही उठुनी जाई जरी ती बाहेर ।
तरी तव स्वरुपावांचुनी करो न अन्य व्यवहार ।
तत्चिंतनीं ही, वृत्ती राहो सदा तत्पर ।
तत्कथनीं तत् श्रवणीं, वृत्तीं होवो तदाकार ।
आंस ही पुरवा म्हणुनी ठेवितें चरणीं मी माथा ।
तव स्वरुपावांचुनी० ॥१॥
जी वस्तु मी पाहे ती दिसो मज सच्चिदानंद ।
सत्वस्तु पाहण्याचा लागो सद्गुरु मज छंदा ।
वस्तु पाहातां व्हावा अंतरीं बाहेरी स्वानंद ।
त्या स्वानंदीं मुरुनी व्हावा मज ब्रम्हानंद ।
तुजवांचुनी कोण समर्थ सद्गुरु ताता ।
तव स्वरुपावांचुनी० ॥२॥
तव कृपेने वृत्ती सद्गुरु राहो मुरुनी ॥
हें जाणुनीया अनन्य शरण आलें तव चरणीं ।
तव कृपाप्रसादें द्वैत टाकी काढुनी ।
तत्पदींचें तीर्थ तें ब्रम्ह करी तत्क्षणीं ।
म्हणे वारी ही सद्गुरु ऐसी अघटीत तव सत्ता तव स्वरुपावांचुनी० ॥३॥