किती अंत पाहासी गुरुराया । शरण मी असें तव पाया ॥सद्गुरु ॥ध्रृ.॥
अपराध असती जरी माझे । हें अज्ञान बालक तूझें ॥
बहु असे । नेणे ती कैसी भक्ति ।
न कळे मज कांहीच युक्ति ॥ मुळीच ती ॥ चाल ॥
ना कला, न जाणें शास्त्राला, असें मी : अबला ।
नेणे व्युत्पत्तीला नेणें व्युत्पत्तीला ।
कोण येईल साह्य कराया ॥ तुजविणें ॥ किती अंत० ॥१॥
ये धांवत गुरुमाऊली । कृपेची करा साऊली ॥ बालका ॥
तूं हरिणी मी पाडस । जीव होतो कासावीस ॥
तुजविणे ॥चाल॥ तुजविणें, कांही मी नेणे, बालक तव तान्हे ।
न धरवें धैर्या, न धरवें धैर्या । मम सद्गुरु तुम्ही आचार्या ॥
या त्वरें ॥ किती अंत० ॥२॥
तळमळ लागली चित्तीं । कधी पाहीन सद्गुरुमूर्ति ॥
प्रेमाने ॥ पाहुनी हृदयी ध्याईन ।
प्रेमाने आलिंगीन ॥ हृदयीं मी ॥चाल ॥
हें तन मन आणि धन, चरणीं अर्पीन ।
सद्गुरुराया सद्गुरुराया । जातसें वय हें वाया ॥
तुजविणें ॥ किती अंत० ॥३॥
भेटीची आंस मनीं फार । द्या दर्शन येवुनी सत्वर ॥
सद्गुरु ॥ कां करीसी आता उशीर ।
न धरवें मुळी, धीर ॥ सद्गुरु ॥चाल॥
ही वारी, चरणावरी, राहे निरंतरी ।
ऐशा सांगा उपाया , सांगा उपाया ।
अनन्य शरण मी तव पाया ॥ सद्गुरु ॥ किती अंत० ॥४॥