यजमानानें तैलाभ्यंग स्नान करून उत्तम अलंकार घालून सर्व मंगलकारक साहित्य जमवून रांगोळे वगैरेनीं सुशोभित केलेल्या शुद्धस्थानीं पूर्वेस तोंड करून कंबलांनी आच्छादित केलेल्या पीठावर बसावें आणि आपल्या उजव्या हाताकडे पूर्वेंस तोंड केलेल्या आपल्या स्त्रियेस बसवावें आणि तसेंच ज्याला संस्कार करावयाचा असेल त्यालाही बसवावें. वेदवेत्त्यांनीं ‘ यशस्करं० (१) ’ या मंत्राचा घोष करावा. सुवासिनींनी यजमानाला मंगलकारक तिलक करावा, नंतर यजमानानें दोन आचमन करून, पवित्र धारण करावें.
" देवींवाच० " (२) " यावतीओ " (३) हे मंत्र म्हणून इष्टदेवता, कुलदेवता, ह्यापुढें फ़ळ, तांबूल, इत्यादि ठेवून त्यांना नमस्कार करावा. सर्व देवांना, वेदवेत्त्या ब्राह्मणांनां व पितरादिकांनां नमस्कार करावा.
केशवादि चोवीस नामांनीं आचमन करून प्राणायम करावा.
" श्रीमन्महागणाधि० " येथपासून " जनार्दना: " येथपर्यंत हात जोडून म्हणावें.
नंतर हातांत अक्षता व पाणी घेऊन " श्रीमद्भगवतो० " येथपासून "अमुक कर्म करिष्ये " येथपर्यंत म्हणून पाणी सोडावे.
पुन: हातांत पाणी घेऊन " तदंगतयादौ " हें म्हणून संकल्प सोडावा.
नंतर आणखी हातांत पाणी घेऊन " तत्रादौ० " हें म्हणून आरंभिलेलं कर्म निर्विघ्नपणें शेवटास जावें म्हणून प्रथम गणपतिपूजन करतों असा संकल्प करावा.
" गणानांत्वा० " (४) या मंत्रानें तंडुलपुंजावर मांडलेल्या सुपारीचे ठिकाणें ऋद्धिबुद्धिसहित, अंगासहित, परिवारासह, आयुधासह, शक्तिसह गणपतीचें आवाहन करितों. असें म्हणून अक्षता वाहून गणपतीचें आवाहन करावें.
"ॐ भूर्भुव:स्व: गणपतये नम: " या मंत्रानें गणपतीची आसन, पाद्य, अर्ध्य, आचमन, स्नान, वस्त्र, गंध, अक्षत, पुष्प, दूर्वा, हळदकुंकू, धूप, दीप, नैवेद्य, फ़ल, तांबूल, दक्षिणा, प्रदक्षिणा, या षोडशोपचारांनीं पूजा करावीं.
" निषुसीद० " (५) या मंत्रानें पुष्पांजली समर्पण करून " कार्यमे० (६) हा श्लोक म्हणून प्रार्थना करावी.
" अनया० " मी केलेल्या ह्या पूजेनें सर्व विघ्नें हरण करणारा गणपति प्रसन्न होवो असें म्हणून पाणे सोडावें.