पूर्व दिवशीं हविष्यान्नानें एक भुक्त राहिलेल्या पत्नीला मंगलस्नान घालून नवीन वस्त्र व अलंकार धारण करवून आपल्या दक्षिणेस बसवावें यजमानानें आचमन करून प्राणायाम करून देशकालाचें संकीर्तन करून, ह्या माझ्या पत्नीचें ठिकाणीं उत्पन्न होणार्या सर्व गर्भांचे बीजासंबंधीं व गर्भासंबंधीं दोषांचा परिहारपूर्वक पुरुष देवतेच्या ज्ञानोदयाच्या प्रतिबंधकाचा परिहारद्वारानें पुंसवनसंस्कार आणि अनवलोभन संस्कार, तसाच ह्या माझ्या पत्नीचें ठिकाणी गर्भाची वृद्धि होण्यास प्रतिबंध करणार्या, मांस रुधिरप्रिय असणार्या राक्षसींच्या समुदायाम्चा नाशपूर्वक क्षेम आणि सकल सौभाग्याचें मूलकारण महालक्ष्मीच्या प्रवेशद्वारानें प्रत्येक गर्भामध्यें बीज आणि गर्भ ह्यांपासून उत्पन्न होणार्या पापांचा नाश करणार्यांचा अतिशयद्वारानें स्त्रीसंस्काररूप सीमंतोन्नयन नांवाचा संस्कार, इतके तीनही संस्कार तंत्रानें करीन. तदंगत्वाने श्रीगणपतिपूजन; पुण्याहवाचन, मातृकापूजन आणि नांदीश्राद्ध करीन, असा संकल्प करून ती पृष्ठ ४ पासून २२ पर्यंत क्रमानें करावीत. स्वस्तिवाचनाचें वेळीं ह्या पुंसवन, अनवलोभन आणि सीमंतोन्नयन कर्मांचा पुण्यदिवस आहे. असें तुम्ही बोला म्हणून यजमानानें बोलावें त्यावर ह्या कर्मांचा पुण्यदिवस असो. स्वस्ति असो व कर्म वृद्धि पावो, असें आचार्यानें म्हणावें. नांदीश्राद्धामध्ये ऋतुदक्षसंज्ञक विश्वेदेव घ्यावेत.
तदंग होम करण्याकरितां स्थंडिल इत्यादि करीन. विधिवत् औपासनाग्नि पवमान ह्या देवता पुंसवन इत्यादि पृथक् असतील त्यावेळेस घ्याव्यात, पुंसवन, अनवलोभन आणि सीमंतोन्नयन हीं तिन्ही बरोबर असतील तर मंगल नांवाच्या अग्नीची स्थापना ( स्थालीपाक पृष्ठ ३३ प्यारा १ पासून पृष्ठ ३६ प्यारा ५ पर्यंत ) करावी. पुंसवन, अनवलोभन आणि सीमंतोनयन ह्यांच्या होमामध्यें देवतांचा परिग्रह करण्याकरितां अन्वाधान करीन असा संकल्प करून स्थालीपाक पृष्ठ ३७ प्यारा ६ “ चक्षुषीआज्येन ” येंथपर्यंत म्हणून, प्रजापतीला चरूनें, दोन वेळां धात्याला, दोन वेळां राकेला, तीन वेळां विष्णुला, प्रजापतीला तुपानें, असा प्रधानदेवतेचा उच्चार करून नंतर स्थालीपाकतंत्र पृष्ठ ३७ प्यारा ७ “ शेषेण० ” येथून पृष्ठ ४५ प्यारा २१ येथपर्यंतचें, सर्व तंत्र करावें. त्यांत विशेष “ प्रजापते० निर्वपामि ” असें म्हणून चार मुठी तांदूळ घालावेत; त्यावर प्रोक्षण, अनघात इत्यादि करावें.
नंतर आपल्या दक्षिणेस पश्चिमेस मान केलेले, उत्तरेस लोम केलेलें असें बैलाचे चर्म आंथरावें. आपल्या आणि अग्नीच्या मधून पत्नीस आचमन करवून आणून त्या चर्मावर बसवावें. नंतर पतीनें पत्नीच्या हातांस स्पर्श करून स्थालीपाक पृ. ४५ प्यारा २२ येथून पृ. ४६ प्यारा २३ पर्यंत करावा.
पत्नीनें दोन्हीं हात धुवून त्याचा पसा करून गुडघ्याच्या आंत घेऊन त्या उजव्या हातावर समानरूप वत्स असलेल्या गाईचें अथवा दुसर्या गाईचे दुधाचें तयार झालेलें पसाभर दही ठेवून त्यावर लिंगासारखें पूर्वेस अग्र असलेले यव ठेवून त्याच्या दोन बाजूस दोन अंडासारखें दोन माष म्हणजे उडीद ठेवून काय पित्येस, असें पतीनें स्त्रीला तीन वेळां विचारावें, तिनें पुंसवन पित्ये असें तीन वेळां उत्तर द्यावें. नंतर ते यव आणि माषसहित दधि संपूर्ण प्यावें व बाहेर आचमन करावें. पुन: असेंच २ वेळां प्रश्न करावा कीं काय पित्येस तिनें पुंसवन असें प्रतिवचन देऊन दधि प्राशन करावें आणि नंतर आचमन करावें.