ऐरिणी ( वंशपात्र ) दान
‘ संस्कार ’ हे केवळ रूढी म्हणून करण्यापेक्षां त्यांचे हेतू जाणून ते व्हावेत अशी अनेकांची इच्छा असते. ज्यावेळीं एखाद्या घरांमध्यें शुभकार्य असते त्यावेळीं या गोष्टी सविस्तर माहीत असल्यास कार्य सुव्यवस्थित पार पडते असा अनुभव आहे.
विवाहाचें चवथे दिवशीं रात्रीस, जर त्या रात्रीं भद्रा इत्यादि दोष असतील तर दिवसाच कन्यादात्यानें भार्येसह देश आणि काल ह्यांचें स्मरण करून विवाहाच्या संपूर्णतासिद्धीकरितां वराची आणि त्याच्या आईबाप इत्यादिकांची व त्याच्या पक्षाकडील लोकांची आपल्या वैभवानुरूप वस्त्र इत्यादिकांनीं पूजा करीन, असा संकल्प करून कन्यापित्यानें, वर व वराचें आई, बाप, भाउ इत्यादिकांना आपलें शक्तिप्रमाणें वस्त्रे व सुवासिक द्रव्यें देऊन त्यांस संतुष्ट करावें.
नंतर वरपित्यानें कन्येचे पूजन करावें. “ अभिवस्त्रा० ” ह्या मंत्रानेम रेशमीवस्त्र इत्यादि देऊन “ आयुष्यं० ” ह्या सूक्ताच्या “ भूषणधारण ” मंत्रांनीं सोन्याचें अलंकार इत्यादि द्यावें. “ या:फ़लिनी:० ” ह्या मंत्रानें फ़ुलांच्या माळा इत्यादि देऊन “ सुमंगली:० ” (४९) ह्या मंत्रानें भांगेमध्यें सिंदूर ठेवावा. “ मांगल्यतंतु० ” हा मंत्र बोलून मंगलसूत्र वरानें वधूच्या कंठांत बांधावें.
नंतर कन्येच्या पित्यानें ऐरिणीचें ( वंशपात्राचें ) पूजन करावें. उमामहेश्वरच्या प्रीतिद्वारा कन्यादानफ़लाची संपूर्णता प्राप्त होण्याकरितां आणि वंशाची वृद्धि होण्याकरितां ऐरिणीपूजन आणि वराच्या आईच्या ऐरिणीदान करीन असा संकल्प करावा. “ ऐरिणित्वमुमा० ” (५०) हे मंत्र म्हणून ध्यान करावें व नाम मंत्रानेम त्या ऐरिणीवर उमामहेश्वर यांची षोडशोपचारांनीं पूजा करावी. हें ऐरिणी नांवाचें वंशपात्र सोळा सुपांसह वराच्या आईला अथवा तिच्या जागीं असलेल्या आजी किम्वा चुलतीस अथवा दुसर्या कोणाला देत आहे. हें तुझें आहे माझें नाही असें म्हणून वरमातेच्या हातावर उदक सोडावें. “ वंशोवंशकर:श्रेष्ठ० ” (५१) इत्यादि श्लोक म्हणावे. ( हें वंशपात्र कंचुकीसहित वरमातेच्या, व वरपक्षीय मुख्य मुख्य स्त्रिया व पुरुष यांच्या मस्तकावर ठेवण्याची चाल आहे ) त्या प्रमानें कन्येच्या पित्यानें कन्येला घेऊन वराचा बाप आणि आई इ० वरपक्षीयांच्या मांडीवर पृथक् पृथक् बसवून त्यांची प्रार्थना करावी की, ह्या कन्येचे मी आज पर्यंत पुत्राप्रमाणें रक्षण केले आहे. आतां तुमच्या मुलाला ( भावाला इत्यादि ) दिली आहे तर हिचें ममतेनें पालन करावें.
नंतर सौभाग्य इत्यादिकांचीं वृद्धि व्हावी ह्यांकरितां ब्राह्मणांच्या सुवासिनींना वायनें द्यावींत. ब्राह्मणांनी यथाशक्ति भूयसी दक्षिना द्यावी. हें सर्व केलेले कर्म उमामहेश्वरास अर्पण करावें. ऐरिणीदानाचे दिवशी वधूच्या आईबापांनी उपोषित राहून ऐरिणी ( वंशपात्र ) दान झाल्यावर भोजन करावें.
N/A
References : N/A
Last Updated : May 24, 2018
TOP