सायंकालीन औपासनहोमाचा प्रयोग
‘ संस्कार ’ हे केवळ रूढी म्हणून करण्यापेक्षां त्यांचे हेतू जाणून ते व्हावेत अशी अनेकांची इच्छा असते. ज्यावेळीं एखाद्या घरांमध्यें शुभकार्य असते त्यावेळीं या गोष्टी सविस्तर माहीत असल्यास कार्य सुव्यवस्थित पार पडते असा अनुभव आहे.
कर्त्यानें सूर्यास्तसमयीं संध्यावंदन केल्यावर औपासनकुंडाअंत अथवा स्थंडिलावर प्रज्वलित केलेल्या अग्नीच्या पश्चिमेस पूर्वाभिमुख होऊन दर्भादि आसनावर बसावें. आचमन प्राणायाम करून देशकालाचा उच्चार करावा. अग्निरूपी परमेश्वराच्या संतोषाकरितां सायंकालीन औपासनहोम करतो. असा संकल्प करून “ चत्वारिश्रृंगा० ” या मंत्रानें प्रज्वलित अग्निपुरुषाचें ध्यान करावें. नंतर हातांत पाणी घेऊन स्थंडिलाच्या ईशान्यदिशेपासून पुन: ईशानदिशेपर्यंत त्रिवार उत्तान हस्ताने सिंचन करावें आणि परिस्तरणार्थ १६ दर्भ घेऊन उत्तर क्रमानुसार कुंडाचें सभोवती ४।४ दर्भ ठेवून उदकानें पुन: तीनवेळ सभोवती पालथ्या हातानें प्रोक्षण करावें. स्वच्छ धुतलेले तांदूळ एका पात्रांत घालून ते पात्र सामध ( इध्मा ) व बर्हि यासह अग्नीच्या उत्तरेस दर्भावर ठेवून गर्भरहित प्रज्वलित अशा दर्भानें तें प्रकाशित करून उदकानें प्रोक्षून तेंच दर्भकोलित पुन: होमद्रव्यासभोवती त्रिवार फ़िरवून टाकावे. आणि हात धुवून बर्हि अग्नीच्या पश्चिमभूमीवर पूर्व पश्चिमाग्रानें पसरून समिधेसह होमद्रव्य त्यावर ठेवावें. नंतर “ विश्वानिन इति० ” हा ऋषिदेवताछंद स्मरून हातांत अक्षत घ्यावी आणि “ विश्वानिनोदु० ” ८ या मंत्रांनीं अग्नीच्या पूर्वेपासून अष्टदिशेस अक्षत ठेवून गंधपुष्पादि उपचारांनीं पूजा करावी. “ यस्मैत्वं० ” या मंत्रांनें हात जोडून अग्नीस नमस्कार करावा. नंतर उजवा गुडघा खाली टेकवून ती समिध ( इध्मा ) कांहीं न बोलता अग्नींत टाकून हात धुवावा. नंतर डावा हात हृदयास लावून उजव्या हातांत पात्रांतील १०० किंवा ६४ संख्याक तांदूळ घेऊन अंगुलीच्या अग्रांनी त्या समिधेच्या प्रदीप्तज्वालेपर “ अग्नयेस्वाहा ” हे बोलून पहिली आहुति द्यावीं. व “ अग्नय इदं नमम ” हा त्याग बोलावा. नंतर पहिल्यापेक्षां अधिक तांदुळ घेऊन तशीच दुसरी आहुति “ प्रजापतये स्वाहा ” असा मनांत उच्चार करीत करीत त्या समिधेच्या प्रदीप्त ज्वालेवर द्यावी. “ प्रजापतयइदं नमम ’’ हा त्याग बोलावा. नंतर पूर्वीप्रमाणें बसून हात धुवून घातलेले परिस्तरण काढून पूर्ववत् परिसमूहन पर्युक्षण करावे. आणि अग्निच्या वायव्य प्रदेशी पूर्वाभिमुख उभे राहून हात जोडून अग्नीकडे पहात असतां “ अग्नआयूंषि० ” “ अग्नेत्वन्नो० ” “ प्रजापते० ” “ तंतुंतन्वन्० ” “ हिरण्यगर्भ:० ” या मंत्रांनीं उपस्थान करून बसावे. न्यूनातिरिक्तदोषत्वाबद्दल “ यस्यस्मृत्याच० ” यानें विष्णुस्मरण करून “ अनेन० ” म्हणून पाणी सोडावे. अग्नीचे रक्षण व्हावे एतदर्थ अग्नीस इंधनें वगैरे लावून ठेवावी.
N/A
References : N/A
Last Updated : May 24, 2018
TOP