मराठी मुख्य सूची|विधी|संस्कार|सोळा संस्कार|सार्थ षोडशसंस्काररत्नमाला|
पुण्याहवाचन प्रयोग

पुण्याहवाचन प्रयोग

‘ संस्कार ’ हे केवळ रूढी म्हणून करण्यापेक्षां त्यांचे हेतू जाणून ते व्हावेत अशी अनेकांची इच्छा असते. ज्यावेळीं एखाद्या घरांमध्यें शुभकार्य असते त्यावेळीं या गोष्टी सविस्तर माहीत असल्यास कार्य सुव्यवस्थित पार पडते असा अनुभव आहे.


पुढील मंत्र प्रत्येक कलशाबद्दल निराळे म्हणावेत. आणि प्रथम दक्षिणेकडचे कलशाची, नंतर उत्तरेकडचे कलशाचे अशी पूजा वगैरे करण्याचा क्रम ठेवावा. कर्त्या यजमानानें आपल्यापुढें " महीद्यौ:० " (१) हा मंत्र दोन वेळां म्हणून प्रथम दक्षिणेकडच्या, नंतर उत्तरेकडच्या भूमीस स्पर्श करावा. " ओषधय:० " (२) हा मंत्र म्हणून हस्त स्पर्श केलेल्या भूमीवर एक शेराचे. शक्ति नसेल तर त्याहून कमी असे तांदुळाचें दोन ढीग करावेत. " आकलशेषु० " (३) हा मंत्र म्हणून सुवर्णाचे, रुप्याचे, तांब्याचे किंवा शुद्ध मातीचे फ़ुटके नसून अलंकृत केलेले असे दोन कलश त्या दोन ढीगांवर ठेवावेत. " इमंमेगंगे० " (४) हा मंत्र म्हणून दोन्ही कलश तीर्थाच्या पाण्यानें किंवा शुद्ध पाण्यानें भरावेत. " गंधद्वारा० " (५) हा मंत्र म्हणून त्या भरलेल्या कलशांत गंध घालावें. " कांडात्कांडा० " (६) हा मंत्र म्हणून त्या कलशांत दूर्वा घालाव्या. "  अश्वत्थेवो० " (७) हा मंत्र म्हणून पंचपल्लव ( पिंपळ, उंबर, जांबूळ, आंबा व वड यांचे डहाळे ) कलशांत घालावे. " या:फ़लिनी० " (८) हा मंत्र म्हणून कलशांत फ़ळ घालावें. " सहिरत्नानि० " (९) हा मंत्र म्हणून कलशांत पंचरत्न ( सोने, रुपें, मोती, पोवळे, हिरा अथवा माणिक ) टाकावे. " हिरण्यरूप:० " (१०) या मंत्रानें कलशांत पैसे टाकावे. " युवासुवासा:० " (११) या मंत्रानें कलशांस वस्त्र किंवा सूत्र वेष्टन करावें.
" पूर्णादर्वि० " (१२) ह्या मंत्रानें तांदूळ घातलेल्या अशा पूर्णपात्रांनीं दोन्ही कलशांचीं तोंडें झांकावी म्हणजे कलशावर पात्रें ठेवावीत.
" तत्वायामि० " (१३) ह्या मंत्रानें कलशांवर अंगासहित परिवारासहित आयुधांसह आणि शक्तिसह अशा वरुणाचें आवाहन करतों असें म्हणून उत्तरेकडील पूर्णपात्रांत तांदुळावर ठेविलेल्या सुपारीचे ठिकाणीं अक्षता वाहून वरुणाचें आवाहन करावें. " ॐ भूर्भुव:स्व: वरुणायनम: " या मंत्रानें वरुणाला चंदन अर्पण करावें त्याचप्रमाणें याच मंत्रानें अक्षता, पुष्प, धूप, दीप, नैवेद्य या पंचोपचारांनीं वरुणाची पूजा करावी. आणि " तत्त्वायामि० " या मंत्राने वरुणाला पुष्पांजलि अर्पण करावी. " अनेने० " ह्या केलेल्या पूजनानें वरुण प्रसन्न होवो असें म्हणून पाणी सोडावें.
" कलशस्य० "ह्या सर्व श्लोकांनीं हात जोडून कलशाची प्रार्थना करून उत्तरेकडील कलशांत अक्षता घालाव्यात. " मातृदेवोभव " इत्यादि मंत्र म्हणून नमस्कार करावा.
यजमानानें दोन्ही गुडघे भूमीस लावून बसावें. दोन्ही हात कमलासारखे करून उत्तरेकडचा कलश घेऊन आपले तिघांच कपाळीं तीन वेळां धारण करून ठेवावा. त्यावेळी ब्राह्मणांनीं " एता:सत्या:० " (१४) इत्यादि मंत्र म्हणावेत. नंतर यजमानानें ब्राह्मण जे असतील त्यांचे हातांवर पाणी घालून गंध, अक्षता, पुष्प, फ़ल, दक्षिणा या उपचारांनीं पूजा करावी. त्यावेळीं यजमानानें " गंधा:पांतु " इत्यादि पूर्वार्ध मंत्र बोलावे आणि ब्राह्मणांनीं " सौमंगल्यंचास्तु " इत्यादि उत्तरार्ध मंत्र बोलावे. नंतर यजमानानें " यंकृत्वासर्व० " हें म्हणून हे ब्राह्मणहो आपण पुण्याह म्हणजे पुण्यदिवस असावा असें बोलावें. मग ब्राह्मणांनीं पुण्यदिवस असे असें बोलावे.
यजमानानें " भद्रंकर्णेभि: " (१५) इत्यादि पुढील मंत्र म्हणावेत. नंतर यजमानानें व्रत, नियम, तप, स्वाध्याय, यज्ञ, इंद्रियनिग्रह, दान, ह्यांनीं युक्त असलेल्या ब्राह्मणांचे मन सावधान असो अशी प्रार्थना करावी. ब्राह्मणांनीं आम्ही सावधान मनाचे आहो असे बोलावे. यजमानानें आपण प्रसन्न व्हा अशी प्रार्थना करावी. ब्राह्मणांनीं प्रसन्न आहों असे बोलावे.
नंतर यजमानानें " शांतिरस्तु " इत्यादि (१६) वाक्यें म्हणून ताम्हनात पाणी सोडावे व " तिथिकरण० "
इत्यादि (१७) वाक्यांतील देवता संतुष्ट होणे बद्दल प्रार्थना करावी. नंतर " हता ब्रह्मद्विष: " इत्यादि (१८) वाक्यें म्हणून ( ताम्हना ) बाहेर सोडावें. नंतर " शुभानि वर्धतां " वगैरें (१९) वाक्यें म्हणून ( पुन्हा ताह्मनांत ) पाणी सोडावें.
नंतर " निकामे " (२०) हा मंत्र म्हणून " शुक्रांगारकादि " (२१) वाक्यें म्हणून पुण्यकारक अशा कालाचें उच्चारण करितो.  असेसं ( कर्त्यांनें ) म्हटल्यावर ( विप्रांनीं ) वाच्यतां म्हणून आज्ञा ( प्रतिउत्तर ) द्यावी.
( कर्त्यानें ) " उद्नाते "; (२२) इत्यादि मंत्र म्हणून ( यजमानानें ) कुटुंबासह महाजनास नमस्कार करून आशिर्वादाची अपेक्षा करणारा ( असा मी ) त्या मला ( आज करी असलेल्या अमुक ) कर्मांस ( आजचा ) दिवस पुण्यकारक असल्याचें ( आपण अभिवचनरूपी ) प्रतिवचन द्यावे. ( म्हणून प्रार्थना करावी ) त्यावर ॐकार युक्त पुण्य दिवस आहे. असें ब्राह्मणानीं सांगावें.
याप्रमाणें तीन वेळ झाल्यावर ( कर्त्यानें ) " स्वस्तये " (२३) इत्यादि मंत्र म्हणावे. पुन्हा " मह्मं. " आदि म्हनून अरित असलेल्या कामीं कल्याण होईल असे प्रतिवचन द्यावे. असे म्हणावें. ब्राह्मणांनीं " आयुष्मते स्वस्ति " म्हणून प्रतिवचन द्यावें.
( नंतर कर्त्यानें ) " ऋध्यामस्तोमं " (२४) इत्यादि मंत्र म्हणून पुन्हा " मह्मं " म्हणून या ( करित असलेल्या ) कर्माची ऋद्धि ( सम् - ऋद्धि - समृद्धि - म्हणजे संपूर्णता ) होवो असे म्हणावे म्हणून ब्राह्मणास प्रार्थना करावी. नंतर ब्राह्मणांनीं ॐ ऋध्यतां. " ( संपूर्णता होवो. ) म्हणून प्रतिउत्तर द्यावे.
" श्रिये जात: " (२५) इत्यादि मंत्र ब्राह्मणांनीं म्हणावे. व ( सुवासिनींनीं कर्त्यास वगैरे ) आरती करावी. नंतर ( कर्त्यानें ) मह्मं इत्यादि ( या चालूं ) कर्मात लक्ष्मीची परिपूर्णता असो असे म्हणावे. ब्राह्मणांनीं " अस्तु श्री: " ( लक्ष्मी पूर्ण असो ) असे प्रतिवचन दिल्यावर ( व १०० वर्षें परिपूर्ण आयुष्य ) असो. गोत्राची ( संततीची ) वृद्धी होवो. ( हा आशीर्वाद दिल्यावर ( कर्मांगदेवता ) पुढें लिहिल्या आहेत त्यावरून ( प्रसन्न ) ( संतुष्ट ) होवोत म्हणून " शुक्रेभि व तदप्ये " (२६) हे मंत्र म्हणावे.
नंतर उत्तरेला कलश उजव्या हातानें व दक्षिणेचा कलश डाव्या हातानें असे धरून ( पूर्णपात्रे खाली ठेऊन ) सरळ हातानें दोन्हीं कलशांतील पाण्याच्या धारा " वास्तोष्पते० " (२७) या मंत्रानें ताह्मनांत सोडाव्या.
नंतर कर्त्यानें पत्नीस डावीकडे बसवून उत्तरेकडे तोंड केलेल्या ब्राह्मणाकडून तें ताम्हनांतील पाणी ( जें कर्त्यानें सोडिलें तें ) त्यानें अभिषेक ( स्वत: वगैरेस ) करवावा. ब्राह्मणांनींही " समुद्रज्येष्ठा " (२८) " त्रायंतां "
" इमाआप: शिवतमा " (२९) " देवस्यत्वा " (३०) सुरास्त्वा (३१) या मंत्रांनीं अभिषेक करावा.
नंतर कर्त्यांनें आचमन करून दक्षिणा देऊन " आमूरज " (३२) हा मंत्र म्हणून पुण्याहवाचनाचें संपूर्ण फ़लप्राप्त झाल्याबद्दलचें सांगण्याविषयीं ( ब्राह्मणांस ) प्रार्थना करावी. नंतर ब्राह्मणांनीं ( आपणांस ) पुण्याहवाचनाचे ( संपूर्ण ) फ़ल मिळो. असें प्रतिवचन द्यावे. पुण्याहवाचन झालें.

N/A

References : N/A
Last Updated : May 24, 2018

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP