विवाहाची अग्नि देवता आहे, करितां विवाहाच्य अंगभूत पुण्याहवाचन असेल तर " कर्मांगदेवता अग्नि: प्रीयताम् " असें म्हणावे. याप्रमाणेंच पुढें सांगितलेल्या कर्मांच्या अंगभूत पुण्याहवाचन असेल तर त्यावेळीं त्या त्या कर्मांच्या देवतेचा उचार करावा. औपासन होमाची देवता सूर्यप्रजापति, स्थालीपाकाची देवता अग्नि, गर्भाधानाची ब्रह्मा, पुंसवनाची प्रजापति, सीमंताची धाता, जातकर्माची मृत्यु, नामकर्म निष्क्रमण, अन्नप्राशन कर्मांची देवता सविता, उपनयनाची इंद्र, श्रद्धा, मेधा व शेवटीं सुश्रवा देवता, पुनरुपनयनाची अग्नि देवता, समावर्तनाची इंद्र देवता, उपाकर्म व व्रत यांची सविता, वास्तुहोमाची वास्तोष्पति व शेवटी प्रजापति, आग्रयण कर्माची ( कार्तिक पौर्णिमेस नव्या साळीचा होम करणे ) आग्रयण देवता, सर्पबलीची सर्प, तडागादिकांची वरुण, ग्रहयज्ञाची नवग्रह देवता, कूष्मांडहोम, चांद्रायण व अग्न्याधान ( आग्निहोत्र ) यांची देवता अग्नयादि, अग्निष्टोमाची ( वसंतऋतूत ५ दिवस करण्याचा यज्ञ ) अग्नि, आणखी दुसरी जी इष्टकर्में असतील त्यांची प्रजापति देवता, अशा रीतीने कर्मांगदेवता जाणाव्यात.