मराठी मुख्य सूची|विधी|संस्कार|सोळा संस्कार|सार्थ षोडशसंस्काररत्नमाला|
कन्यादानाचा विधि

कन्यादानाचा विधि

‘ संस्कार ’ हे केवळ रूढी म्हणून करण्यापेक्षां त्यांचे हेतू जाणून ते व्हावेत अशी अनेकांची इच्छा असते. ज्यावेळीं एखाद्या घरांमध्यें शुभकार्य असते त्यावेळीं या गोष्टी सविस्तर माहीत असल्यास कार्य सुव्यवस्थित पार पडते असा अनुभव आहे.


“ ॐ अनृक्षरा. ” (१८) हा मंत्र म्हणून वराचें तोंड पूर्वेस आणि कन्येचे तोंड पश्चिमेस अशी एकमेकाकडे तोंड करून उभी करावी. नंतर कन्यादात्यानें वधूवरांच्या दक्षिणेस पत्नीसह उत्तरेस तोंड करून बसावें. आचमन व प्राणायाम करावा. देश आणि काल ह्यांचें संकीर्तन करावें. अमुक प्रवरानें युक्त, अमुक गोत्र असलेला, अमुक नांवाचा मी माझ्या समस्त पितरांना निरतिशय आणि आनंदासह ब्रह्मलोक प्राप्ति इत्यादि कन्यादानाचें फ़ल प्राप्त होण्याकरितां ह्या वरापासून ह्या कन्येचे ठिकाणी उत्पन्न होणार्‍या संततीच्या योगानें बापाच्या कुळांतील बारा आणि पतिकुलांतील बारा पुरुषांना आणि आपल्याला ( मिळून २५ पिढ्या ) पवित्र करून उद्धार करण्याकरितां आणि श्रीलक्ष्मीनारायणाची प्रीति होण्याकरितां आणि ब्राह्मविवाहाच्या विधीनें मी कन्यादान करतो; असें दर्भ, अक्षता, ह्यांनीं युक्त उदक घेऊन संकल्प करावा.
तेथें उदकाच्या शुद्धीकरितां वरुणाची पूजा आणि उदकाचे अभुमंत्रण करीन असा संकल्प करून, पूर्वेस अग्र केलेले अथवा उत्तरेस अग्र केलेले असें दर्भ पसरून त्यांवर पाण्यानें भरलेला कलश ठेवावा. त्यांत व्रीहि आणि यव ( गहू ) घालावेत, गंध आणि पुष्प इत्यादिकांनीं त्याला अलंकृत करावें. त्याच्या तोंडावर दूर्वा आणि पल्लवांनी झाकावें. “ आपोहिष्टा० ” इत्यादि नऊ ऋचांनीं अभिमंत्रण करावें त्यावर वरुणाची पूजा करावी. असा शिष्टाचार आहे.
नंतर पत्नीसह उत्तरमुख असे उभे राहून कन्येच्या स्कंधाला स्पर्श करून “ कन्यांकनक संपन्नां० ” (१९) हे मंत्र म्हणावें. नंतर कांस्यपात्रावर कन्येचा अंजली, त्यावर वराचा अंजली व त्यावर आपला अंजली धरावा. आणि पुरोहितानें मंत्रून ठेविलेलें उदकपात्र आपल्या उजव्या हाताकडे असणार्‍या पत्नीच्या हाती द्यावें; आणि पत्नीकडून पात्रंतील पाणी आपल्या अंजलीवर बारीक धारेनें सतत घालवावें. तें आपल्या अंजलीतील पाणी खाली कन्येच्या अंजलींवर धरलेल्या वराच्या अंजलीच्या उजव्या हातांवर पडून नंतर कन्येच्या अंजलीतून खालील दुसर्‍या कोणा एका कडून धरलेल्या कांस्यपात्रांत पडत असावें. कन्यापित्यानें “ कन्यातारयतु, पुण्यंवर्धतां ” (२०) इ. १२ मंत्र म्हणून अमुक प्रवराचा, अमुक गोत्राचा, अमुक नांवाचा मी “ ममसमस्तपितृणां० ” येथून “ लक्ष्मीनारायणप्रीतये ” येथपर्यंत म्हणून अमुक प्रवराचा, अमुक गोत्राचा, अमुकाचा पणतू, अमुकाचा नातू, अमुकाचा पुत्र, अमुक नांवाच्या श्रीधरस्वरूपी कन्या मागणार्‍या वराला अमुक प्रवराची, अमुक गोत्राची, अमुकाची पणती, अमुकाची नात, अमुकाची कन्या, अमुक नावाची श्रीस्वरूपिणी प्रजापति देवतेची कन्या प्रजोप्तादन करण्याकरिता तुला मी देत आहे; आपण कन्येचा स्वीकार करा, असे बोलून वराच्या हातावर दर्भाक्षतांसह जल घालावें. प्रजापति प्रसन्न होवो असें मनानें स्मरावें अशाच रीतीनें पुन: पूर्ववत् “ कन्यातारयतु ” इत्यादि दोन वेळां करावें.
नियमबंधादि :- नंतर वरानें बरें ठीक आहे स्वीकारतो; असें म्हणावें आणि कन्येच्या उजव्या हातानें स्पर्श करून “ ॐ कइदं० ” (२१) हा मंत्र बोलावा व धर्म व प्रजा ह्यांच्या सिद्धीकरितां मी ह्या कन्येचा स्वीकार करितों असें बोलावें. नंतर दात्यानें “ गौरींकन्यमिमां० ” (२२)) हे श्लोक म्हणून धर्माकरितां, अर्थाकरितां आणि कामाकरितां हिचे उल्लंघन करूं नकोस. असें दात्यानें म्हटल्यावर त्यावर वरानें बोलावें कीं, मी हिचे धर्म, अर्थ आणि काम ह्या बाबतींत उल्लंगन करणार नाहीं. नंतर दात्यानें बसून; ह्या केलेल्या कन्यादानाच्या प्रतिष्ठासिद्धेकरितां हें अग्निदेवताचें सुवर्ण दक्षिणारूपानें तुला मी देत आहे असें म्हणून जलासह सुवर्ण ( आंगुठी मोहोर ) वराच्या हातांत देऊन हें माझें नाहीं असें बोलावें. वरानें ठीक आहे असें म्हणावें. नंतर दात्यानें तांब्या, पंचपात्री, जेवणाचें ताट, गाई, म्हैसी, घोडे, हत्ती, दासी, दास, जमीन, गाड्या, अलंकार ( कंठी, आंगठी ) इत्यादि आपल्या शक्तीप्रमाने वराला द्यावें. नंतर वरानें “ यक्तक्षी० ” (२३) हा मंत्र म्हणून कन्येच्या उजव्या कुशीस स्पर्श करावा.
नंतर उपाध्यायानें पूर्वीं अभिमंत्रित केलेलें कलशांतील पाणी कांस्यपात्रांत ओतून “ अनाधृष्ट० ” ह्या मंत्रानें उदकाचें अभिमंत्रण करावें आणि त्या पाण्यानें हिरण्य, पवित्र, दर्भ, दूर्वा, पल्लव ह्यांच्यासह उंबराच्या ओल्या डाहळीनें वधू आणि वर ह्या दोघांवर “ आन: प्रजांजनयतु०, समुद्रज्येष्ठ०, ( पृष्ठ १७ ओळ ७ ) आपोहिष्ठ०, देवस्यत्वा० ” ह्या मंत्रांनीं अभिषेक करावा.
नंतर वधूवरास समोरासमोर बसवून दुधानेम भिजविलेल्या दुहेरी पांढर्‍या सुतानें दंपतीच्या कंठदेशाला व कटिदेशाला ईशान्यदिशेस आरंभ करून चार वेळ किंआ पांच वेळ प्रदक्षिण वेष्टन करावें. वेष्टनाचे वेळीं उपाध्यायानें* “ परित्वागिर्वणो० ” हे मंत्र म्हणावे. वेष्टन झाल्यावर कंठाचें सूत्र खालीं जमिनीवर ठेऊन कटीचें सूत्र वर काढावें आणि वधुवरांस उठवून जमिनीवरील सूत्र उचलावें. त्या सूत्राला कुंकुम लावून पीळ घालावा त्या सूत्रांत हळकुंडें व ऊर्णा ( लोकर ) बांधून तें सूत्र वरानें वधूच्या डाव्या मनगटांत “ ॐ नीललो० ” (२४) हा मंत्र म्हणून बांधावें. तसेंच कटिदेशांतील सूत्र त्याप्रमाणेच करून वधूनें वराच्या उजव्या हाताच्या मनगटांत त्याच मंत्रानें बांधावें.

N/A

References : N/A
Last Updated : May 24, 2018

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP