गर्भाधानापासून अन्नप्राशनापर्यंत जे संस्कार त्याविषयी अधिकमास, क्षयमास, गुरु शुक्राचा अस्त, इत्यादिकांचा दोष नाहीं; परंतु प्रथम ऋतु प्राप्त झाल्यापासून सोळा दिवसांत गर्भाधान करणे असल्यास दोष नाहीं. पुढें केल्यास दोष आहे. तो असा: - कोणत्याही संस्काराचा मुख्य कालाचा अतिक्रम झाला असतां तो संस्कार दक्षिणायन, तसेंच गुरु शुक्राचा अस्त, यांत न करितां उदय झाल्यावर ज्या संस्कारास जी नक्षत्रें तिथ्यादिक सांगितली आहेत, तो संस्कार त्या तिथ्यादिकानें परिपूर्ण असलेल्या दिवशी करावा. गर्भाधान संस्काराच्या तिथी :- षष्ठी, अष्टमी, पौर्णिमा, अमावस्या, चतुर्थी आणि चतुर्दशी, ह्या तिथी वर्ज करून शेष तिथी शुभ आणि सोमवार, गुरवार, शुक्रवार व बुधवार हे शुभ जाणावे. नक्षत्रे :- स्वाती हस्त, अनुराधा, रोहिणी, श्रवण, धनिष्ठा, शततारका, तिन्ही उत्तरा ही नक्षत्रे गर्भधानास शुभ चित्रा, पुनर्वसु, पुष्य, अश्विनी ही नक्षत्रे मध्यम. जन्मनक्षत्र, भरणी, मूळ, रेवती आणि मघा ही नक्षत्रे वर्ज्य आहेत. ज्या नक्षत्रावर गर्भधारणा होते त्या नक्षत्रापासून दहाव्या नक्षत्रीं संतती उत्पन्न होते. म्हणून ही तीन नक्षत्रे गर्भधानास वर्ज्य आहेत. कौस्तुभांत ज्येष्ठा नक्षत्रही वर्ज्य सांगितले आहे.
गर्भाधानास ग्रहबल विचार :-- ज्या लग्नावर गर्भाधान करावयाचे त्या लग्नाचे केंद्रस्थानी म्हणजे १।४।७।१० तसेंच ९।५ या स्थानीं सौम्यग्रह म्हणजे शुक्र, गुरु, बुध, हे असावे आणि चंद्रबल असता तसेंच पापग्रह म्हणजे मंगळ, रवि, शनि, राहू हे तृतीय, एकादश, षष्ठ या ठिकाणी असतां अशा लग्नावर गर्भाधान केले असतां ते पुत्र देणारे होते.