सहावे महिन्यांत हा संस्कार करावा बलवान् बालक बालक सहावे महिन्यांत होते पण साधारण शक्तिवान् बालकाला आठवा किंवा नववा महिना अन्न पचण्यास योग्य होतो. बलकाला ज्या वेळी अन्न पचविण्याची शक्ति येईल त्यावेळी हा संस्कार करावा. बहुत करून सहा महिन्यानंतर बालकाला खालचे दांत निघण्यास आरंभ होतो. या वेळीं बालकाला क्षार किंवा मीठ पदार्थावर त्याची इच्छा होते. त्यामुळें ते माती चाटण्याचा उपक्रम करते. कारण मातींत क्षार किंवा मीठ असते. माती चाटण्याबद्दल बालकावर नजर ठेवणे ठीक आहे. परंतु भाजलेली १ रत्ती किंवा १ रत्ती थोड्याशा मधांत एक वेळ चाटण्यास दिली तर चांगले त्या योगे त्याला माती चाटण्याची जरूर लागणार नाहीं. रबराची अथवा ज्येष्ठमध काष्ठाची चोखणी दात निघण्याचे दिवसात दिली तर लाभदायक होईल ज्यावेळीं बालकाला अन्नप्राशन करणे असेल त्यावेळी बालकास अन्न हलके व पातळ, हितकारक द्यावे. हे अन्न प्राशन आहे अन्नभक्षण नव्हे.
त्याप्रमाणेच नेहमी प्रयत्नपूर्वक ग्रह ( मानसिक रोग, भय वगैरे ) उपद्रवा पासून बालकाचे रक्षण करणे योग्य आहे. ज्यायोगे बालकास सुख होऊन त्रास न होईल असे ठेवावे. कांहीं खांत नसेल, रडेल, त्रास करील तर त्याला, राक्षस, भूत पिशाचाची भीति घालू नये कारण बालक भीते. त्याला अनुकूल व प्रिय असे भाषण करून त्याचे मन प्रसन्न ठेवले तर त्याची शरीरवृद्धि होऊन ते सत्वसंपन्न व आनंदित राहाते. त्याला मोरी वगैरे अशा अशुद्ध जागीं ठेवू नये. अत्यंत उष्ण हवा, पाऊस; धूळ, तलाव, नदी आड वगैरे जागीं ठेवू नये. खुल्या हवेंत ठेवावे. अन्नप्राशन संस्कार करून बालकाला थोडे थोडे अन्न व दूध द्यावे १ वर्षानंतर दूध सोडून द्यावे. उत्तम अनाचे योगानें बालक तेजस्वी व पराक्रमी होते म्हणून तूपयुक्त भात अथवा तूप, मध, दहियुक्त भात द्यावा. ४ तोळे भात शिजतेवेळीं चार मासे त्यांत तूप टाकावे. भात शिजल्यावर त्यांत १ तोळा मध, व १ मासा दहि मिसळून द्यावे. तूप व मध समभाग देऊं नये. ते विष होते.
सहावा, आठवा, दहावा, बारावा या मासीं अथवा पूर्ण वर्ष झाले असतां त्या काळी पुत्राचा अन्नप्राशन संस्कार करावा. पांचवा, सातवा, नववा या मासीं कन्यांचे अन्नप्राशन करावे. द्वितीया, तृतीया, प्म्चमी, सप्तमी, त्रयोदशी आणि दशमी ह्या तिथि; बुध, गुरु, शुक्र हे वार शुभ, रवि, चंद्र हे वार क्वचित् ग्रंथांत सांगितले आहेत. अश्विनी, रोहिणी, मृग, पुनर्वसु, पुष्य, तीन उत्तरा, हस्त, चित्रा, स्वाती, अनुराधा, श्रवण, धनिष्ठा, शततारका आणि रवती ही नक्षत्रे शुभ, जन्मनक्षत्र शुभ असें कोणी ग्रंथकार म्हणतात. भद्रा, वैधृति, व्यतिपात, गंड, अतिगंड, वज्र, शूल, परिघ हे योग वर्ज्य करावेत.