दत्तकग्रहण विचार
‘ संस्कार ’ हे केवळ रूढी म्हणून करण्यापेक्षां त्यांचे हेतू जाणून ते व्हावेत अशी अनेकांची इच्छा असते. ज्यावेळीं एखाद्या घरांमध्यें शुभकार्य असते त्यावेळीं या गोष्टी सविस्तर माहीत असल्यास कार्य सुव्यवस्थित पार पडते असा अनुभव आहे.
ज्याला पुत्र नाहीं तो स्वर्गलोकास पात्र नाहीं असें शास्त्र आहे. म्हणून पुत्र नसल्यास दत्तकपुत्र घ्यावा. तो आपल्या सपिंडातीलच घ्याव. सपिंडातील नसल्यास आपल्या गोत्रांतील घ्यावा. या वचनात अपत्य शब्द आहे, याचा अर्थ पुत्र व कन्या दोन्ही असा असतो. दत्तकाच्यासंबंधानें शौनकाचे मत असेच आहे म्हणजे सपिंडातीलच मुलगा घ्याव्वा. सपिंडांतील नसल्यास आपल्या गोत्रातील घ्यावा, दुसरा घेऊ नये सपिंड आणि सगोत्र यांमध्यें सख्ख्या भावाचाच मुलगा दत्तक घ्यावा. कारण भावाचा मुलगा तोच निपुत्रिकाचा पुत्र होय. त्याच मुलाने त्याच्या सर्व पारलौकिक क्रिया कराव्या. याप्रमाणें सख्ख्या बंधूंमध्यें एकाला मुलगा असेल तर तोच सर्व बंधूंचा मुलगा होय असें मनूचें वचन आहे, म्हणून बंधूचाच मुलगा दत्तक घ्यावा. तो नसल्यास सावत्र बंधूचा घ्यावा. तसाही नसल्यास आपल्या गोत्रांतील जो कोणी जवळचा असेल त्याचा मुलगा घ्यावा. तोही नसल्यास भिन्नगोत्रसपिंडांतील घ्यावा, म्हणजे मामाच्या कुळांतील, किंवा बापाच्या बहिणीच्या कुळांतील, अथवा मुलीच्या कुळांतील जो सन्निध असेल तो घ्यावा. परंतु मुलीचा मुलगा अथवा बहिणीचा मुलगा ( भाचा ) अथवा बापाच्या बहिणीचा मुलगा हा घेऊं नये, हें योग्यच आहे. कारण तिघांचे ठायीं विरुद्ध संबंध असल्यामुळें पुत्रबुद्धि ठेवण्यास योग्य नाहींत. याप्रमाणेंच मुलगा अशी बुद्धि ठेवणें ज्याच्यावर संभवत नाहीं असा दत्तक घेऊं नये. ( उदाहरण जसें चुलता ) मुलीचा मुलगा, बहिणीचा मुलगा. हे शूद्रामध्यें दत्तक होतात. ज्याला एकच मुलगा असेल त्यानें दत्तक देऊं नये. पुष्कळ मुलगे असल्यास दत्तक देण्यास हरकत नाहीं. त्यांतही वडील मुलगा दत्तक देऊं नये व घेऊं नये. त्याप्रमाणेंच स्त्रियांनीं पतीच्या आज्ञेवांचून दत्तक पुत्र देऊं नये व घेऊं नये. पति नसतां सवतीसही मुलगा नसेल तर विधवेनेंही दत्तक पुत्र व्यावा. आणि पुष्कळ मुलगे असतील तर द्यावा. एकाला पुष्कळ बायका असून त्यापैकी एकीला मुलगा असल्यास त्या सर्व स्त्रिया त्या मुलानें पुत्रवती होतात, असें मनूचें वचन आहे, म्हणून तो सर्वांचाच मुलगा होय. याकरितां दुसर मुलगा घेऊं नये. ज्याला मुलगा नसेल अथवा होऊन मृत झाला असेल त्यानें दत्तक मुलगा घेण्याकरितां उपोषण करून वस्त्रें व कुंडले इत्यादि देऊन घ्यावा.
N/A
References : N/A
Last Updated : May 24, 2018
TOP