मराठी मुख्य सूची|विधी|संस्कार|सोळा संस्कार|सार्थ षोडशसंस्काररत्नमाला|
औपासननामक सायंप्रातर्होमाचा निर्णय

औपासननामक सायंप्रातर्होमाचा निर्णय

‘ संस्कार ’ हे केवळ रूढी म्हणून करण्यापेक्षां त्यांचे हेतू जाणून ते व्हावेत अशी अनेकांची इच्छा असते. ज्यावेळीं एखाद्या घरांमध्यें शुभकार्य असते त्यावेळीं या गोष्टी सविस्तर माहीत असल्यास कार्य सुव्यवस्थित पार पडते असा अनुभव आहे.


गृह्याग्नीचा आरंभ विवाह विधि झाल्यापासून असतो. गृह म्हणजे घरांत राहणारी जी पत्नी म्हणजे गृहिणी तीच घर आहे. आतां पत्नीचे स्वीकरण लग्नाचे वेळीं होत असल्यामुळे ह्या कालाला जोडून हें गृहकृत्य ( म्हणजे गृह्याग्निसेवन ) करावें. अशी शास्त्रकाराची आज्ञा असल्यामुळें गृह्याग्नीच्या उद्देशाने औपासननामक सायंप्रातर्होमाचा विधि येथे देत आहे.
विवाहप्रसंगी श्वशुरगृही विवाहहोम झाल्यानंतर गृहप्रवेशसमयीं गृहप्रवेशनीय होम करून आपल्या घरीं गृह्याग्नीची स्थापना करण्याकरितां विवाहाग्नीवर समिध शेकवून घेतात. व ती समिध स्वत: वरयात्रा ( वरात) प्रसंगीं घरी आणावयाची असतें. हा प्रकार हल्लींही प्रत्येकाच्या लग्नांत केलेला आढळतो. परंतु स्वगृही प्रवेश केल्यानंतर औपासन कुंडांत किम्वा स्थंडिलावर त्या समिधेत गुप्त रूपानें ठेविलेला अग्नि प्रत्यवरोहणरूपानें प्रज्वलित करून त्यावर गृहप्रवेशनीयविधि व स्थालिपाकादिविधि करावयाचे ते मात्र कोणी केलेले हा विधि यथासांग होण्यास अग्नीचा समारोप करून घरी आल्यावर पुन:संधानविधीनें अग्नि सिद्ध करून गृहप्रवेशनीयहोम करून नंतर सायंप्रात:औपासन होमास आरंभ करावा.
अग्नीला होम देण्याच्या उपासनेला औपासनहोम म्हणतात. विवाह झाल्यानंतर एक क्षणही अग्नीवाचून राहू नये. जो द्विज अग्नीवांचून राहतो तो व्रात्य व पतित समजावा. ज्ञान व द्रव्य इत्यादिकांचे अभावामुळे जो श्रौतकर्मास समर्थ नाहीं त्यानें यथाशक्ति स्मार्तकर्म करावे. या स्मार्ताग्नीला आवसथ्य ( गृहांतील अग्नि ) असेही नांव आहे. ह्या गृह्याग्नीचे सेवनानें ( औपासन होम केल्याने ) सर्व धर्माचरणाचे श्रेय, ब्रह्मतेजस्विता, मानमान्यता सुख, ऐश्वर्य, सत्कीर्ति, सिद्धि, ज्ञान, व मोक्षही मिळतो. दान धर्म, व्रते, वैकल्यें यांत फ़ार श्रम असून विघ्नें असतात. परंतु यापासून सर्व दानव्रताचे श्रेय मिळून पुष्कळ संपत्ति व जगांतील पवित्र वस्तूंचा लाभ होतो. आतां शास्त्रीय दृष्ट्या पाहिले असतां होमोत्पन्न वायूमुळे आरोग्य, आयुष्य व शक्तिवर्धनास साहाय्य होते. यज्ञाचे परिणाम यज्ञकुंडवेदी जवळील माणसांना चांगलें होतातच; पण त्याहून कितीतरी पटीनें अधिक चांगले परिणांम वायु शुद्ध होऊन समाजस्वास्थास कारणीभूत होतात स्वत:च्या व आपल्या कुंटुंबाच्या हिताकरितां तरी दोन वेळा होम प्रतिदिवशी केलाच पाहिजे, असा दंडक आहे. अग्नीस लागणार्‍या यज्ञसामुग्रीकडे दृष्टिक्षेप केल्यास यज्ञसंस्थेच्या उपयुक्ततेबद्दल विचारी माणसास संशय वाटावयास नको. अनुभवाने हें तत्त्व आपल्या पूर्वज ऋषीना चांगलें समजले होते, म्हणूनच त्यांनीं विवाह होताच गृह्याग्नीवर सायंप्रात: औपासनहोम करण्यास सांगितले आहे.
गृहस्थाश्रमीच्या नित्यकर्मात पंचमहायज्ञांना महत्त्वाचे स्थान असल्यामुळे त्याची नित्यसंस्कारांत गणना केली आहे; परंतु रोजचा वैश्वदेव आज किती कुटुंबात होत असेल त्याचप्रमानें पार्वनस्थालीपाक व औपासनहोम याचीही पाकयज्ञ व हविर्यज्ञ संस्थेच्या संस्कारातच गणना केली आहे. विवाहाग्नी ( गृह्याग्नी ) वरच संपूर्ण गृह्यकर्म करावे, पंचमहायज्ञ, उपाकर्मोत्सर्जन, वास्तुविधि, सर्वकाम्यविधी वगैरे सर्वअग्निकर्म त्यावरच करावें. एवढेच नव्हे तर स्वयंपाक दुद्धा गृह्याग्नीवरच करावा. कोणतेही अग्निकर्म गृह्याग्निवांचून करूं नये.
गृह्यकारिकेंत सांगितले आहे - या औपासन ( गृह्याग्नि ) होमाला आरंभ ज्या दिवशी विवाहाग्नि सिद्ध केला असेल, त्याच दिवशी सायंकाळीं करावा व नंतर दुसरे दिवशी सकाळी होम करावा. या क्रमानें प्रथम सायंहोम व नंतर प्रातर्होम हा शास्त्रविहित विधिनियम होय. जर एखादेवेळीं आपणास कांहीं उद्योगासंबंधानें अडचण किंवा परगावी जाणे असेल, त्यावेळी सायंप्रातरौपासनहोम आपल्या पत्नीनें करावा. पत्नीलाही रजस्वला किंवा प्रसूतीसंबंधानें अडचण असेल तर, पुत्र, कुमारी, भाऊ, भाचा, जावई, ऋत्विज, शिष्य यातून कोणा एकाकडूनही करवावा. मात्र कितीही संकट आले तरी औपासन होमाला कधीही आळा घालूं नये. हस्ते परहस्ते हा विधि नित्य चालूं ठेविलाच पाहिजे.
हवनद्रव्यें - साळी, ( भात ) श्यामाक ( सावे ) यव ( जव ) ह्यांचे तांदूळ घ्यावें. किंवा दूध, दहि, तूप, यव, व्रीहि, गहू, प्रियंगु ( कांगराळे ) व तीळ जसे असतील तसेंच घ्यावें. तांदूळ इत्यादि कठीण पदार्थ प्रत्येक आहुतीस १०० किंवा ६४ घ्यावें. तांदूळ इत्यादिकांचा होम उजव्या उताण्या हातानें करावा. दूध दहि इत्यादि पातळ पदार्थ स्रुवा नामक पळीनें द्यावे. त्याचेम प्रमाण - प्रत्येक आहुतीस १ तोळाभर घ्यावे. समिधा टीच प्रमाणाच्या घ्याव्या, अन्न ग्रासप्रमाण घ्यावे.
होमातील अग्नीचे स्वरूप - जेथें काष्ठ तेथें कान, जेथें धूर तेथें नासिका. जेथें थोडी ज्वाला तेथें नेत्र. व जेथें भस्म तेथें शिर आणि ज्याठिकाणी चांगला प्रज्वलित ते मुख समजावे. मुखाव्यतिरिक्त दुसरे अंगावर आहुति दिल्यास अनिष्टकारक आहे. म्हणून अगदीं वाळलेली इंधनें घालून चांगल्या प्रज्वलित अग्नीला आहुति द्यावी.
गृह्याग्नि घेण्यास मुहूर्त - भद्रा व्यतिपात वगैरे कुयोग नसता, रोहिणी, रेवति, विशाखा, पुष्य, ज्येष्ठा, मृग, कृत्तिका आणि तिन्ही उत्तरा यांवर प्रथम अग्न्याधानास आरंभ करावा.
होमाचा काळ टळल्यास - अग्नी प्रज्वलित करून आज्यसंस्कार झाल्यावर स्रुवांत आज्य घेउन “ ॐ भूर्भुव:स्व: स्वाहा ” या मंत्रानें एक आहुति देऊन नंतर नित्य होम द्यावा.
समस्यहोम - आतां दोनवेळा औपासनहोम करण्यास असमर्थ असेल तर, एकदाच सायंकाळी “ सायंप्रातर्होमौसमस्यं करिष्ये ” असा संकल्प करून एकतंत्रानें करावा.
दर्शपौर्णमास स्थालीपाक - गृह्याग्नीच्या सिद्धयर्थ दर्शस्थालीपाक व पौर्णमासीस्थालीपाक असें विधि करावयाचे असतात. ज्या दिवशीं स्थालीपाक करावयाचा असेल मग तो दर्शनिमित्तक असे वा पौर्णमासीनिमित्तक असो. प्रथम नित्य प्रातरौपासन होम समाप्त करून नंतर आचमनादि करावे व देशकालादिकाचा उच्चार करून “ दर्शपूर्णमासाभ्यांस्थालीपाकाभ्यांयक्ष्ये ” असा संकल्प करून “ स्थालीपाक ” ( पृष्ठ ३३ पहा ) करावा.
आयतनसंस्कार - औपासनहोमाकरितां ( पृष्ठ ३० ) “ औपासन कुंडालक्षणम् यांत सांगितल्याप्रमाणें घरांत ईशान्यदिशेस चांगल्या पवित्र जागेवर कुंड तयार करावे. नंतर ते गोमयाने सारवून घ्यावे, गंधादिकांनीं सुशोभित करावे, त्यांत समिधेनें स्थालीपाक पृष्ठ ३४ प्यारा ३ यांत सांगितल्याप्रमाणे रेखा ओढून प्रोक्षण वगैरे करावे.
विवाहाग्नि ( गृह्याग्नि ) नष्टझाला असेलतर - “ विच्छिन्नस्य गृह्याग्ने: पुन:संधानम् हा प्रयोग पृष्ठ ९६ यांत दिला आहे. त्या प्रयोगांत आज्याहुति, लाजाहुति, हृदयांजन वगैरे विवाहहोमाचे व त्याचे समानतंत्र आहे. लाजाहोम पत्नीच्या अंजलीनें करावा, परंतु आहुति देतेवेळीं स्वत: द्यावी. पत्नीचे भावादिकाकडून विवाहाप्रमानें देऊं नये. याप्रमाने गृह्याग्नि सिद्ध करून त्यावर औपासनहोम नित्य करावा.
होमाचा काल - सायंकाळी सूर्यास्तानंतर ९ घटिकापर्यंत मुख्य काल त्यापुढे गौण समजावा. प्रात:काळीं सूर्योदयापासून १० घटिकापर्यंय मुख्यकाल. त्या पुढे गौन समजावा.
आसनाची आवश्यकता - औपासन होमास बसतेवेळीं दर्भासन किंवा कंबलासन घ्याए. दर्भ लोकर व काष्ठ यांत वाहक गुण नसल्यामुळें शरीरातील वीज बाहेर जाणेस व बाहेरची वीज शरीरांत येणेस प्रतिबंध होतो. म्हणूनच उपासनेचे वेळीं दर्भ, लोकर, काष्ठ व शाल वगैरे पवित्र मानले आहे. या विषयाचे विशेष वर्णन गृह्याग्निसागर व धर्मसिंधु यांत पहावे.


References : N/A
Last Updated : May 24, 2018

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP