मधुपर्काचा विधि
‘ संस्कार ’ हे केवळ रूढी म्हणून करण्यापेक्षां त्यांचे हेतू जाणून ते व्हावेत अशी अनेकांची इच्छा असते. ज्यावेळीं एखाद्या घरांमध्यें शुभकार्य असते त्यावेळीं या गोष्टी सविस्तर माहीत असल्यास कार्य सुव्यवस्थित पार पडते असा अनुभव आहे.
कन्यापित्यानें वराची मधुपर्कपूजा करण्याकरितां स्वच्छ उदकानें भरलेली पायधुण्याकरितां, अर्ध्याकरितां, मंत्रयुक्त तीन वेळां आचमन करण्याकरितां आणि शुद्ध आठ वेळां आचमनकरितां अशी चार पात्रें, मधुपर्काचे पात्र ( मध व दहि एकत्र केले म्हणजे त्यास मधुपर्क म्हणतात ) कांस्यपात्र, विष्टर ( पंचवीस दर्भांची खाली अग्रें करून डावें हाताकडे पीळ घातलेली दोरी ) इतकें साहित्य संपादन करून, नंतर कन्या दात्यानें पत्नीसहित वराच्यापुढें पश्चिमाभिमुख बसावें आचमन करून प्राणायाम करावा, देश काल ह्यांचें स्मरण करावें, कन्येकरितां घरीं आलेल्या * स्नातक अशा वराप्रीत्यर्थ कन्यादानाचें अंगभूत अशा मधुपर्कानें पूजन करीन असा संकल्प करावा. विष्टर असें तीन वेळां बोलून पूर्वी सांगितलेला विष्टर वराचे हातांत द्यावा. वरानें हातात घेऊन “ अहंवर्ष्म० ” (१) हा मंत्र म्हणून विष्टराचें उत्तरेस अग्र करून त्यावर बसावें. नंतर तेच पात्र पूजा करणारानें पत्नीच्या हातीं देऊन तिजकडून पाणी वराच्या उजव्या आणि डाव्या पायाअर घालवावें आणि आपण “ अस्मिन् राष्ट्रें० ” (२) हे मंत्र बोलून पाय धुवावेंत. ( धुतल्यावर कोरे वस्त्रानें पुसण्याची चाल आहे. ) नंतर वरानें लौकिक म्हणजे शुद्ध पाणी घेऊन आचमन करावें. अर्ध्य असें तीन वेळां म्हटल्यावर गंध, पुष्प, फ़ल ( सुपारी ) ह्यांनीं युक्त असें अर्ध्य वराच्या ओंजळींत घालावें. आचमनीय असें तीन वेळां म्हटल्यावर तें घेऊन, तें पात्र वरापुढें जमिनीवर ठेवावें. वरानें त्या पात्रांतून थोडें हातावर पाणी “ घेऊन “ अमृतोपस्तरणमसि ” असें म्हणून तें प्राशन करावें. आणि दुसर्या शुद्ध पाण्यानें आचमन करावें नंतर आणलेला मधुपर्क “ मित्रस्य० ” (३) ह्या मंत्रानेम त्या पात्रांतील पहावा. कन्यादात्यानें मधुपर्क असें तीन वेळां म्हणून वराच्या पुढें करावें, वरानें, “ देवस्यत्वा० ” (४) हा मंत्र म्हणून तें मधुपर्कपात्र आपल्या अंजलीमध्यें घ्यावें आणि “ मधुवाता० ” (५) हें मंत्र म्हणून तें मधुपर्कपात्र डाव्या हातांत घेऊन पहावें. नंतर उजव्या हाताच्या अंगुष्ठ आणि अनामिका ह्या दोहोंनी मधुपर्काला तीन वेळां प्रदक्षिणरीतीनें ढवळून अंगुलीमध्यें असलेला मधुपर्काचा लेप “ वसवस्त्वा० ” (६) ह्या मंत्रानें किंचित् पूर्वेकडे टाकावा. “ रुद्रास्त्वा० ” (७) ह्यानें दक्षिणेस टाकावा “ आदित्या० ” (८) ह्यानेम पश्चिमेस टाकावा. “ विश्वेत्वा० ” (९) ह्यानें उत्तरेस टाकावा. “ भूतेभ्यस्त्वा० ” (१०) ह्यानें पात्राच्या मध्यभागाचा मधुपर्क थोडा थोडा घेऊन तीन वेळां वर उडवून मधुपर्काचें पात्र जमिनीवर ठेवून आणि त्यांतील किंचित् मधुपर्क हातावर घेऊन “ विराजोदोहोसि ” (११) या मंत्रानें प्राशन करून शुद्ध पाण्यानें आचमन करावें. पुन: घ्यावें आणि “ विराजोदोहमशीय ” (१२) असें म्हणून प्राशन करावें, पूर्ववत् आचमन करावें. आणि पुन: घ्यावें “ मयिदोह:पद्यायैविराज: ” (१३) असें म्हणून प्राशन करून पहिल्याप्रमाणें आचमन करावें. याप्रमाणें तीन वेळां प्राशन करून उरलेला मधुपर्काचा शेष उत्तरेस बसलेल्या ब्राह्मणाला देणें लोकविरुद्ध आहे म्हणून पाण्यांत टाकून द्यावा. ( हें योग्य व हलीं असाच प्रघात आहे. ) नंतर पूर्वी निवेदन केलेल्या आचमन पात्रांतून थोडेसें उदक घेऊन “ अमृतापिधानमसि ” (१४) असें बोलून प्राशन करावें आणि शुद्ध पाण्यानें आचमन करावें. आचमनीय पात्रांतील उरलेलें सर्व उदक घेऊन “ ॐ सत्यंयश:० ” (१५) ह्या मंत्रानें प्राशन करून नंतर शुद्ध पाण्यानें दोन वेळां आचमन करावें. नंतर कन्या देणारानें प्रत्यक्ष गाय असें तीन वेळां वरास निवेदन करावें, किंवा गाईचें निष्क्रयद्रव्य निवेदन करावें. वरानें “ मातारुद्राणां० ” हा मंत्र म्हणून तिला सोड म्हणून सांगावें. नंतर दात्यानें गंध, अक्षत, पुष्प, वस्त्रें, दोन यज्ञोपवीतें, अंगठी वगैरे अलंकार इत्यादि वस्तूंनीं आपल्या सामर्थ्यानुरूप वराचें पूजन करावें. वराबरोबर आलेल्या त्याच्या बंधूंचेंही पूजन करावें.
N/A
References : N/A
Last Updated : May 24, 2018
TOP