वसिष्ठाची स्मृति अशी आहे कीं, कनिष्ठ अंगुलीपर्यंत जो हात तो अरत्नि म्हटला आहे. अशा सोळा हातांचा लांब रुंद मंडप करावा, तो चार द्वारांनी सुशोभित करावा आणि तोरणे बांधावी. सप्तर्षिमतांत - सर्व मंगलकृत्याचे ठायीं मंडप घराच्या मानाने लहान मोठा करावा. दहा हातापेक्षा कमी नसावा. नंतर त्या मंडपांत वेदी करावी. अथवा आठ हात किंवा + बारा हात लांब व रुंद मंडप कराव. दैवज्ञमनोहर सांगतो - चित्रा, विशाखा, शततारका, अश्चिनी, ज्येष्ठा, भरणी, आर्द्रा, पुनर्वसु, पुष्य, आश्लेषा हीं नक्षत्रें सोडून बाकींच्या नक्षत्रांवर फ़ल, तैल, वेदिका, हळद, कांडणे, मंडप इत्यादि विवाहासंबंधीं कर्में करावी. हेमाद्रींत व्यासाचे वचन - कांडण, दळण, यवारक, ( चिकसा ) मंडप, मृत्तिकाहरण, वेदी, चित्रें वगैरे काढणे आणि जाणे येणें ही विवाहासंबंधी सारीं कृत्ये विवाह नक्षत्रावर करावी. नारद वेदी सांगतो - घराच्या वामभागी एक हात उंचीची चार हात लांबीची व चार हात रुंदीची अशी चतुरस्त्र वेदी करावी. तिच्या चार बाजूस चार केळींवे स्तंभ असावे. ती वेदी चारी दिशांस सारखी असून तिला पायर्या असाव्यात. ती वेदी पूर्वेस व उत्तरेस किंचित् उतरती असावी आणि त्या वेदींवर केळींचे स्तंभ व हंस शुक इत्यादि पक्षी असावेत. अशा प्रकारच्या वेदीवर अग्नीसह वधूवरांनीं चढावे. मूळ श्लोकामध्ये बसण्याच्या पूर्वी होमोपयोगी अग्नि त्याचे स्थापन करावे. या ठिकाणी हात वधूचा घ्यावा वेदीला पायर्या सांगितल्या त्या पश्चिमदिशेस कराव्या. वर सांगितलेंले जे वेदीचें प्रमाण त्याच्या बाहेर पायर्या असाव्यात.