देवकोत्थापन व मंडपोद्वासनाचा विधि
‘ संस्कार ’ हे केवळ रूढी म्हणून करण्यापेक्षां त्यांचे हेतू जाणून ते व्हावेत अशी अनेकांची इच्छा असते. ज्यावेळीं एखाद्या घरांमध्यें शुभकार्य असते त्यावेळीं या गोष्टी सविस्तर माहीत असल्यास कार्य सुव्यवस्थित पार पडते असा अनुभव आहे.
केत्यानें सांगितलेल्या काळी मंडपाच्या आंत पत्नीसह पूर्वाभिमुख बसून आचमन प्राणायाम करून देशकालाचा उच्चार करून विवाहाच्या अंगस्वरूपानें स्थापन केलेल्या देवतांचें उत्थापन आणि मंडपोद्वासन व त्याचे अंगभूत गणपतिपूजन आणि पुण्याहवाचन करीन असा संकल्प करावा. “ उत्तिष्ठ० ” “ अभ्यारमिद० ” या मंत्रांनी स्थापित देवतांचें विसर्जन करावें. आणि भगवत्यादिदेवतांचे मंडपाचे आंतच तैलाभ्यंग आणि उद्वर्तनपूर्वक ऊन पाण्याने स्नान घालून पूजन करावें. त्यांस वेष्टिलेली सूत्रें सोडून मग पुण्याहवाचन करावें. अभिषेक झाल्यावर उपाध्यायानें ते भगवती इत्यदि देवतांचें पल्लव देवकाचे सुपांत ठेवून अभिषेक करून राहिलेलें उदक त्या पल्लवावर घालून सर्व कुटुंबासह यजमानाच्या मस्तकावर किंचित् किंचित् शिंपडेतवेळी ‘ प्रेतिचेति० ’’ हा मंत्र उपाध्यायानें तीन वेळां म्हणावा. नंतर कर्त्यानें आपलें मस्तक व हात जोडून आमच्या गोत्रांत सहा सहा महिन्यांनीं मंगल होवों असे आपण बोला, म्हणून ब्राह्मणांची प्रार्थना करावी. त्यांनीही ‘ तसें होवो ’ असें बोलावें. नंतर ब्राह्मणांची गंध, अक्षता, फ़ुलें ह्यांनीं पूजा करून त्यास यथाशक्ति दक्षिणा देऊन संतुष्ट करून त्यांचेकडून आशीर्वाद घेऊन कुटुंबासह भोजन करावें असें मंडपोद्वासन संपले.
N/A
References : N/A
Last Updated : May 24, 2018
TOP