ब्रह्मचार्यानें आपल्या रोजच्या नित्यक्रिया केल्यानंतर आणि प्रात:कालचे अग्निकार्य करून मग आचमन करावें. देश व काल ह्यांचें संकीर्तन करून, मला गृहस्थ इत्यादि दुसर्या आश्रमाच्या प्राप्तीच्याद्वारानें श्रीपरमेश्वराची प्रीति होण्याकरितां समावर्तन संस्कार करीन त्याचे अंगभूत श्रीगणपतिपूजन, पुण्याहवाचन, मातृकापूजन आणि नांदीश्राद्ध करीन, असा संकल्प करून, नांदीश्राद्धापर्यंत सर्व करून, एक समिध आणून ठेवावी नंतर स्थालीपाक तंत्र पृष्ठ ३३ प्यारा २ येथून पृष्ठ ३७ प्यारा ६ पर्यंत करावे. नंतर प्रधानदेवतेचा उच्चार करावा तो - तीन वेळां अग्नि, पवमान आणि प्रजापति ह्या प्रधानदेवतांना तुपानें, अग्निदेवतेला वर ठेवलेल्या समिधेनें व विश्वेदेवांना दहा समिधांनीं असा उच्चार केल्यानंतर स्थालीपाकतंत्र पृष्ठ ३७ प्यारा ७ “ शेषेणस्विष्ठ ” येथून पृष्ठ ४३ प्यारा २ “ आच्छादयेत् ” येथपर्यंत, पुढें पृष्ठ ४३ प्यारा १६ “ ततस्तेपवित्रे० ” येथून प्यारा १७ “ केचित् ” येथपर्यंत करावें.
नंतर अग्नीच्या उत्तरेस पसरलेल्या दर्भांवर साळी, सातू, उडीद आणि तीळ ह्यांचें निरनिराळे चार मातीचे परळ क्रमानें एकेक पूर्वेस तोंड केलेले ठेवावेंत. वस्तरा, थंडपाणी, उनपाणी, लोणी अथवा दही इत्यादि सामग्री अग्नीच्या उत्तरेस ठेवावी. नंतर अग्नीच्या पश्चिमेस बसलेल्या कर्त्याच्या दक्षिनेस मातेनें पूर्वेस तोंड करून बसावें. तिच्यापुढें अग्नीच्या पश्चिमेस एका मातीच्या परळांत शमीची पानें, एका मातीच्या परळांत बैलाचें गोमय ठेवावें. नंतर ब्रह्मानें एकवीस दर्भांचा एक पुंजका घ्यावा आणि मातेच्या दक्षिणबाजूस उभें रहावें. नंतर ब्रह्मचार्यानें स्थालीपाक पृष्ठ ४४ प्यारा १८ येथून पृष्ठ ४६ प्यारा २३ “ हुत्वात्यक्त्वाच ” येथपर्यंत करावा. नंतर “ अग्नआयूंषि० ” “ अग्नेप्रवस्व० ” “ अग्निरृषि:० ” या ३ मंत्रांनीं तुपाच्या तीन आहुति द्याव्या. हे हवि अग्निपवमानाचें आहे माझें नाहीं असें म्हणावें. नंतर “ प्रजापते० ” हा मंत्र म्हणून एक आहुति द्यावी, हें हवि प्रजापतीचें आहे माझें नाहीं असें बोलावें.
नंतर ब्रह्मयानें चौलसंस्कार करतांना जसें घ्यावयाचें तसें थंड व ऊन पाणी एकत्र करून त्यांत लोणी अथवा दह्याची साय मिळवून त्या पाण्यानें बटूच्या डाव्या श्मश्रुप्रदेशापासून तो दक्षिणप्रदेशापर्यंत “ अदिति:० ” हा मंत्र तीन वेळां बोलून तीन वेळां चोळाव नंतर एकवीस दर्भांच्या पुंजक्यांपैकी तीन दर्भ घेऊन बटूच्या उजव्या श्मश्रुभागावर ते तिन्ही दर्भ पश्चिमेस अग्र करून ठेवावे. त्यावेळेस ब्रह्मचारीनें “ ओषधेत्रायस्वमां ” या मंत्राचा जप करावा.
त्यानंतर ब्रह्मानें त्या दर्भांवर वस्तारा ठेवावा, त्यावेळेस ब्रह्मचार्यानें “ स्वधितेमा० ” ह्या मंत्राचा जप करावा. त्यानंतर ब्रह्मानें श्मश्रु ( मिशी ) सह दर्भांचें छेदन “ येनावपत्० ” या मंत्रानें करावें. आणि त्या दर्भांचे अग्र पूर्वेस करून त्यांना शमीच्या पानांबरोबर मिसळवून ते सर्व आईच्या हातांत द्यावें. त्या आईनें ते सर्व दर्भ वगैरे बैलाच्या शेणांत ठेवावे, अशा रीतीनें पुन: तीन वेळां करावें. दरवेळा छेदन करण्याचें विशेष मंत्र असें - दुसर्या वेळेस “ येनधाता० ” तिसर्या वेळेस “ येनभूयश्च० ” हे मंत्र आणि चवथ्या वेळेस “ येनावपत्० ” १ “ येनधाता० ” २ “ येनभूयश्च० ” ३ असे तीनही मंत्र बोलावेंत. असाच प्रकार उत्तरबाजूकडच्या श्मश्रूचे छेदन करतांना करावा. परंतु पहिल्या तीन मंत्रांनीं तीन वेळां छेदन करावें; पण सर्व मंत्रांनीं मिळून चवथ्या वेळीं छेदन करूं नये. त्यानंतर “ यत्क्षुरेण० ” हा मंत्र बोलून अग्रापासून तों मूलापर्यंत वस्तार्याची धारा धुवून नापिताला बोलवावें आणि आचार्यानें ऊन व थंड पाण्याचा उपयोग करून शस्त्र न लागूं देतां, श्मश्रु, लोम आणि नखेंही सर्व दक्षिणेकडून उत्तरेकडे अशी वपन कर, असे त्याला सांगावें. मग त्या नापितानें त्याप्रमाणें करावे. नंतर ब्रह्मचार्यानें करंजाच्या बियांचें पीठ आपल्या शरीरास चोळावें आणि ऊन व थंड अशा पाण्यानें स्नान करावें.
नंतर दोनदा आचमन करून पुन: अग्नीच्या जवळ जाऊन दोन वस्त्रें घेऊन “ युवंवस्त्राणि०सचेथे ” हा मंत्र ( पृष्ठ २७ ओळ ९ ) बोलून एक वस्त्र नेसून दुसरे वस्त्र पांघरावें. नंतर दोन वेळां आचमन करून हातानें काजळ घेऊन ॐ अश्मनस्तेजोसि० ” हा मंत्र दोन वेळां बोलून डाव्या आणि उजव्या डोळ्यामध्यें तें काजळ घालावें. नंतर तोच मंत्र बोलून उजव्या कानांत कुंडलें घालावींत. मग कुंकुम इत्यादि सुवासिक पदार्थ हातांनीं तोंड वगैरें सर्व अंगाला लावून हात धुवावें ‘ ॐ अनार्तास्य० ” ह्या मंत्रानें मस्तकावर मंडोळी बांधावी. “ ॐ देवानांप्रतिष्ठे० ” ह्या मंत्रानें जोडा घालावा. “ ॐ दिवश्छद्म० ” ह्या मंत्रानें छत्री घावी “ ॐ वेणुरसि० ” ह्या मंत्रानें कळकाचा दंड घ्यावा “ आयुष्यंवर्चस्यं० ” ह्या सुक्तानें सुवर्णमणी गळ्यांत बांधावा. त्यानंतर उजवीकडून पागोटें मस्तकाला गुंडाळावें. नंतर पायांत घातलेले जोडे काढावे. नंतर पूर्वीं आणून ठेविलेली समिधा घेऊन उभें राहूनच “ स्मृतंचम० ” इत्यादि “ स्वाहा ” पर्यंत सर्व मंत्र बोलून अग्नींत समीधा टाकावी, टाकतांना ही समिधा अग्नीची आहे माझी नाही असें बोलून टाकावी. मग बसून दुसर्या दहा समिधा “ ममाग्ने ” ह्या सूक्तानें प्रत्येक ऋचेच्या शेवटीं ‘ स्वाहा ’ म्हणून अग्नीमध्यें टाकावी. अशा दहाही समिधा क्रमानें टाकाव्यात.
...ममाग्ने० ” इत्यादि दहा ऋचांनीं होम केल्यावर स्विष्टकृत इत्यादि होमाचा शेष पुरा करावा, म्हणजे स्थालीपाक पृष्ठ ४९ प्यारा २८ येथून पृष्ठ ५३ पर्यंत करावा. नंतर स्नातकानें निमित्तावांचून रात्री व नागवेपणाने स्नान करणार नाहीं. मैथुनावाचून नागवी स्त्री पाहणार नाहीं. पावसांमध्यें धांवणार नाहीं, झाडावर चढणार नाहीं, विहिरीमध्यें उतरणार नाहीं, हातांनीं नदी उतरून जाणार नाहीं, अशीं प्राणसंशयाची कामें व दुसरीं कित्येक प्रकारची प्राणसंशयाचीं कामें करणार नाहीं असा संकल्प करावा. नंतर लंगोटी व करगोटा टाकून द्यावा. ( समावर्तन होण्यापूर्वीच्या मृताबद्दल तीन रात्री आशौच पाळावे. ) येणेंप्रमानें समावर्तनसंस्कार संपला.