आज मी ब्रह्मा पाहिले अगणित सुरगण वर्णीती ज्यासी करकटि ठेवूनी उभे राहिले आज मी ब्रह्मा पाहिले ॥धृ॥
एकनाथाच्या भक्तीसाठी धावत गेला तो जगजेठी-खांदीकावड घेऊनी पाणी वाहिले हरीने पाणी वाहिले ॥१॥
चोख्यासंगे ढोरे ओढिता शिणला नाही तो तत्वदा जनी संगे दळीता कांडीता गाणे गाईले ॥२॥
सावत्या माळ्याची भाजी विकीसी कबिराचे शेले विणीसी गोरोबाचे बाळ रक्षीले हरीने बाळ रक्षीले ॥३॥
दामाजीची रसीद भरली कान्होपात्रा ती उद्धरली अमृत राय म्हणे ऐसी माऊली संकट वारीले ॥४॥