जनी म्हणे रे विठ्ठल दळू कांडू लाग मला, एक दळीता काडीता शीण झाले पंढरीनाथा, देवा तुला घाम आला तुझा पीतांबर भिजला । जनी म्हणे पांडुरगा दासी जनी अंतरगा । जनी म्हणे पंढरीराया दासी जनी लाग पाया । जनी जात होती रानात, मागे येत पंढरीनाथ । जनी वेची वेची, शेण देवा वेचू लागे शेण, वेचूनी बांधली मोठ देवूनी गाठ बळकट देवांनी घेतली शिरी, नेऊनी टाकली जनीच्या द्वारी ।
जनी बसली न्हायाला, पाणी नाही बिसनाया, घेतल्या देवांनी घागरी, गेले चद्रभागे तिरी अशा घाली येरझार्या भरल्या ग जनी घागरी या । जनी विचरीती केस, पाणी घाली ऋषीकेश, जनी उठली न्हाऊन देव गेले ओवाळून । ब्राह्मण म्हणे पदक गेले जनाबाईने नेले, जनी म्हणे मी नाही नेले, देवा विठोबाची आण । चंद्रभागे मध्ये सूळ जनाबाईला आले मूळ, जनी गेली सुळापाशी सुळाचे झाले पाणी, ब्राह्मण लागले जनीच्या चरणी ॥