बाग बगीचे फिरुनी अवघे पुष्पे आणिली बहुत परीची ज्ञान गंगेचे उदक आणूनी शुद्ध पंचामृत घालू वरी ॥ ऐसे हे मनमानस पुजन मान्य करुनी घ्या श्रीहरी ॥धृ॥१॥
देह पितांबर नेसविला शिरीवर शेला पांघरीला नवरत्नाचा हार गुंफुनी कंठी घाली प्रेमभरे ॥२॥
शुद्ध देहाचे करुनी कंकण हरीसी अर्पिले हस्तभुषण भाव कुंडले श्रवणी घालूनी स्वयंभू मुगुट घालू शिरी ॥३॥
अनुभव तुळसी आणिली कवळी हरीसी वाहिली नामावली वैराग्याचे गंध भारी भक्ति टिळामध्ये कस्तुरी ॥४॥
आज्ञानाचा धूप जाळुनी ज्ञानाच्या समया लावूनी पंचप्राणाची आरती करुनी वासना कापूर लावूनी ॥५॥
दिव्य रसाचे अन्न करुनी षडशास्त्राने ते पकवूनी प्रेमरसाचा प्याला भरुनी प्रक्षाळिते प्रेमभरे ॥६॥
निर्गुणाचा विडा करुनी निरकल्पाने हृदयी कल्पूनी सुमन शेजवरी बैसवूनी पूजा करीते मी हरी सेवा करीते मी हरी ॥७॥