तनू कृतार्थ झाली काय मागू या हरीला । देई भक्ती सुधारस नित्य प्यावया मजला ॥धृ॥
कधी मला न व्हावी विषय विषाची बाधा । मी त्रिगुण तंतूने वेष्टिलो रे गोविंदा । मम हृदयी नसावा ठाव क्षणभरी क्रोधा । हा काम गांजितो वारूनी दे आनंता । मूळ अहंकार हा लावितसे ममवृंदा । हा मोह फसूनी मोह लावितो नादा । मजसाठी श्रमली माता श्रीघरा । दे आस पुरवूनी माते उद्धरा । नको नाशवंत हे सारे लेकरा ।
मज अढळ असावे स्थान तुझ्या पदकमला । कधी भंग न व्हावा हेची मागतो देवा ॥१॥
खुण सांगूनी गेले ब्रह्ममुनी मज आता । मी प्रचीत पावलो मोहोनी दीनानाथ, मी सागूं कुणाला तुजवीण दु:खद वार्ता । तुज सर्व ठावूके गावू किती मम गाथा । मज पाजवी पान्हा तुची तात मम माता । सव चंद्र अमृत तू नाही चकोरे चिंता । हरणीने पाडसा नाही टाकीले । धेनूने वत्सा नाही लोटिले, ते असे देवा माते पाळीले । हे सर्व शाश्वत आजवरी न कळे मजला, त्या सद्गुरुनाथा ज्ञान उदय पाडिला ॥२॥
बैसोनी विमानी सुरवर बघती नयना, त्या शिशूबाळाच्या ऐकोनी मंजूळ वचना । दशसहस्त्र वर्ष राज्य करी या भुवना करी दिधले ऎसे प्रेमभरे वरदाना । शशी-सूर्य प्रदक्षणा नित्य घालिती जाणा । धृव अढळ स्थापिला सुर्यवंशीचा राणा । आख्याण धृवाचे येथे संपले । देतील मान मज वाटे जन भले । हरतील पातके ऐसे ऐकले । घृव कथा मृतासी प्राशुनीया कृष्णेला । हा प्रमोद म्हणते गाईल कोण हरीलीला ॥३॥