हर हर शीव शीव स्वार झाले नंदीवर ॥धृ॥
दखन देशामध्ये दक्ष राजा राहात असे अनिवार । त्या राजाला सात कन्या होत्या ऐश्या सुंदर । साती कन्याला पुसतो राजा बसूनी कचेरी समोर । तुम्ही कुणाच्या भाग्यी खाता-साही बोलल्या तुमच्या खातो । त्या राजाला राग आला गेला प्रधान समोर । प्रधानासी आज्ञा केली वर आणावा सत्वर । वेडा बावळा नवरा म्हातारा करु गिरीजेचे स्वयंवर । धुंडीत धुंडीत प्रधान गेला गाव लागले देवपूर । उघडे गोसावी ओमन जोगी बसले होते राखेवर एक गोसावी पकडून त्याने बसविला ऐसा घोड्यावर । रानोमाळ हिंडून त्याने आणिला दक्षाच्या समोर । कुठे गांजा कुठे तंबाखू गुडगुडीची तयारी । म्हणतीरे बाप्या कोशींबिरीचे डेरे आणा लवकरी । कोशीबिर पिऊनशनी घरोघरी केला कहार । वाणी उदमी पळून गेले गेले ऐसे महाद्वार । दक्षराजा लपूनी बसला जाऊन ऐसे माडीवर । पहिली मेहुणी म्हणती भाऊजी गारुडे तुमचे गोळे । दुसरी मेहुणी म्हणती भाऊजी जटाही तुमच्याही लोळे । तिसरी मेहुणी त्रिशूल घेऊनी पळूनी गेली महालात । चवथी मेहुणी घेऊनी तुंबा नाचू लागली अंगणात । पाचवी मेहुनी राख घेऊनी उधळू लागली डोक्यात । सहावी मेहूणी शहाणी होती बसली गोष्टी सांगत । झाले लग्न झाले सारे सगळे वेडा अवतार पंचवीशीच्या भरात आहे रूप दिसत सुंदर । त्याही मेहुण्या सांगत गेल्या तिच्या मातेसमोर । गोसावी नव्हे ते देव आहे गिरिजाबाईचे भाग्य थोर आड पडद्याने सासू पाहती गिरीजाबाईचे स्वयंवर । महादेवाचे लग्न लागले दिवस होता सोमवार । मैनाबाई गाती डोंगरी गिरीजाबाईचे स्वयंवर । वाट लावीत लावीत गेले दोनचार कोसावर । गिरिजाबाई आम्ही हो तुमचे कृपा असूद्या आमूचेवर ॥ हर हर शीव शीव स्वार झाले ।