अर्थालंकार - उपमा
काव्यास ज्याच्या योगाने शोभा येते त्यास अलंकार असे म्हणतात.
आर्या -
दोघांमध्यें भासे सादृश्य श्री तरीच उपमा ते ॥
हे कृष्ण तुझी कीर्ती हंसीसी स्वर्धुनींत बा न्हावे ॥१॥
दोष-गुणास सुधी घे ईश जसा कालकूट - इंदूला ॥
एका कंठी राखे मान तुकावी तसेचि दुजियाला ॥२॥
गद्य -
या उपमालंकाराचे पूर्णोपमा व लुप्तोपमा असे दोन भेद आहेत. ज्यांत उपमान,उपमेय, धर्म आणि उपवाचक यांपैकीं एखादेंही
कमी नसतें तेव्हां पूर्णोपमा होते. ज्यांत वरील चोहोंपैकीं एखादे कमी असतें तेथें लुप्तोपमा जाणावी.
लुप्तोपमेचे आठ प्रकार आहेत ते येणेंप्रमाणें.
१ वाचकलुप्तता.
२ धर्मलुप्तता.
३ धर्मवाचकलुप्ता.
४ वाचकोपमेयलुप्तता.
५ उपमानलुप्ता.
६ वाचकोपमानलुप्ता.
७ धर्मोपमानलुप्ता.
८ धर्मोपमानवाचकलुप्ता.
गद्य-वरील उपमेचे सर्व प्रकार मराठींत सांपडत नाहींत. कांही कांही सांपडतात.
श्लोक-तडिद्गौरी हे कीं हिमकर परी वक्रहि असें ॥
प्रिया कर्पूरासी नयन युगुलाला गमतसे ॥
अहो रुपानेंही मदन वनितासी समजवी ॥
पहातां एकांतीं सुतनु हृदया त्दृष्ट करवी ॥३॥
आर्या - भेट तिची मज झाली तद्रतिचा लाभ जो मला झाला ॥
तें काकताल तुल्यचि होइल ऐसा न तर्क मी केला ॥४॥
गद्य-साहित्य दर्पणकारांनीं पूर्णोपमेचे भेद ६ व लुप्तोपमेचे भेद २१ मिळून एकंदर २७ भेद कल्पिले आहेत. पुन: उपमेचे दोन
भेद कल्पिले आहेत.
१ श्रौती
२ अर्थी
यथा, इव, वत् या शब्दांनीं श्रौती उपमा होते. तुल्य, समान, वत् या शब्दांनीं अर्थी उपमा होते.
दुसरी उदाहरणें.
आर्या-भीष्मशरव्रज दावचि पांडवभटनिकर तो गमे घास ॥
क्षण सोसवे न कोणासहि जैसा वायुवेग मेघास ॥५॥
भीष्मपर्व.
आर्या-प्रभु चित्रकूट टाकुन, राहे गोदावरीतटीं उठजीं ॥
मानससर - सरीसरुह-वनवासी हंसवर जसा कुटजीं ॥६॥
वनपर्व.
अव्यक्त शब्द परिसुन सीते तूं जाहलीस कां ऐसी ॥
मेघांच्या शब्दें जशि उत्कंठित, चकित, हो मयुरीसी ॥७॥
श्लोक-टाकूनि मागुतिच विघ्नसमान पीर ॥
गेला पुढें नय जसा रघुवंशवीर ॥
सीता विभूतिसम मागुन सानुरागें ॥
सौमित्र जाय सुखलाभ तसाच मागें ॥८॥
जेव्हां राम दंडकारण्यांत जाण्या निघाले, तेव्हां त्यांचे बरोबर आयोध्यावासी लोकही निघाले, त्या पौरलोकांस मागें टाकून राम, सीता, व लक्ष्मण दंडकारण्यांत गेले. हा या श्लोकाचा सारांश आहे. येथें रामाची तुलना नीतिमान्पुरुषाशीं केली आहे. नीतिमान्पुरुष कितीही विघ्नें आलीं तरी निश्चयापासून ढळत नाहीं; आणि त्यामुळें ऐश्वर्यसंपन्न होऊन संपूर्ण सौख्य भोगितो. येथें विघ्नांचा निरास व विभूति, व सुखलाभ यांचे अनुगमन हीं पौर, सीता व लक्ष्मण यांच्याशीं तुलिलीं आहेत.
आर्या-जरि देह पुढें जाई मागें मागेंच धांवते हृदय ॥
वायु विरुद्ध दिशेला जातां ध्वज जेंवि चीनदेशीय ॥
हें अप्सरोद्भव खरें कन्यारत्नचि मुनीस सांपडलें ॥
नव मालतीलतेचें अर्कतरुवर जसें कुसुम पडलें ॥१०॥
गद्य - साहित्यदर्पणकारांनीं मालोपमा व रसनोपमा ह्नणून दोन उपमालंकाराचे भेद गणिले आहेत. त्यांची लक्षणें येणेंप्रमाणें. -
आर्या-मालोपमा दिसति जरि उपमानें जैं अनेक एकाला ॥
शशि जेंवि रोहिणीला मदन रतीला तसाच तूं निजला ॥११॥
पूर्वोपमेंत जें जें उपमेय असें पुढील उपमेंत ॥
उपमान होय तें जरि तरि ती रसनोपमा बुधीं विदित ॥१२॥
कमलानें जेंवि तळीं शशिनें जैशी निशीथिनी भासे ॥
तारूण्यें वनिताशी श्रीहि मनोहर नयें करुन दिसे ॥१३॥
मालोपमा.
गद्य-येथें लक्ष्मी नम्रतेमुळें मनोहर दिसते. हें उपमेय आहे; व कमलानें तळीं, चंद्राचे योगानें रात्र व तारूण्यानें स्त्री हीं उपमानें
आहेत.
श्लोक-श्वेत प्रभें हंस सुधांशु साच । हंसापरी ती गमनें प्रियाच ॥
स्पर्शे प्रियेसें सुखकारि वारी । वारीपरी स्वच्छ विहाय भारी ॥१४॥
रसनोपमा.
न हें कुसुम हुंगिलें न दल हें नखीं तोडिलें ॥
न रत्न उपभोगिलें नचि मधू अजी चाखिलें ॥
अहो सुकृत-राशिचें फलचि रुप वाटे मला ॥
पती इजसमान कोण विधिनें असे निर्मिला ॥१५॥
मालोपमा.
जेव्हां दुष्यंतानें शकुंतलेस कण्वाश्रमीं पाहिलें, तेव्हांची ही त्याची उक्ति आहे. येथें शकुंतलेला पुष्प, पान, व मध यांची उपमा दिली आहे.
राकानाथ चकोरा राम तसा चित्रकूटवासि जना ॥
मधु जेंवि मक्षिकांच्या मुनिराजींच्या तसाचि होय मना ॥१६॥
नामांक रामायण.
गद्य-काव्यादर्शकारांनी उपमालंकाराचे पोटभेद ३२ गणले आहेत,
ते येणेंप्रमाणें.
१ धर्मोपमा.
२ वस्तूपमा.
३ विपर्यासोपमा अथवा प्रतीप.
४ अन्योन्योपमा अथवा उपमेयोपमा.
५ नियमोपमा.
६ अनियमोपमा.
७ समुच्चयोपमा.
८ अतिशयोपमा.
९ उत्प्रेक्षितोपमा.
१० निर्णयोपमा.
११ मोहोपमा.
१२ संशयोपमा.
१३ निर्णयोपमा.
१४ श्लेषोपमा.
१५ समानोपमा.
१६ निंदोपमा.
१७ प्रशंसोपमा.
१८ आचिरव्यासोपमा.
१९ विरोधोपमा.
२० प्रतिबोधोपमा.
२१ चटूपमा.
२२ तत्वाख्यानोपमा
२३ असाधारणोपमा अथवा अनन्वय.
२४ अभूतोपमा.
२५ असंभावितोपमा.
२६ बहूपमा.
२७ विक्रियोपमा.
२८ मालोपमा.
२९ वाक्यार्थोपमा.
३० प्रतिवस्तूपमा.
३१ तुल्ययोगोपमा
३२ हेतूपमा.
N/A
References : N/A
Last Updated : February 23, 2018
TOP