अर्थालंकार - असंगती
काव्यास ज्याच्या योगाने शोभा येते त्यास अलंकार असे म्हणतात.
श्लोक-
जैं भिन्न देशत्व विरुद्ध भासत । हेतूंत कार्यांत असंगतीच ते ॥
पीती विषा अंबुदवर्ग जेधवां । पांथस्त्रिया मूर्छित होति तेधवां ॥१॥
गद्य-
यांत "विष" शब्दाचा अर्थ घेतलां असतां जी असंगती वाटते तिचा ’जल’ हा केल्याने निरास होतो. परदेशीं पति असतां त्याची पर्जन्यकाल लागण्याचे पूर्वीच घरीं येण्याची वाट असते.परंतु पर्जन्यकाल लागला आणि पति आले नाहींत ह्णणजे निराश
होऊन विरह करुन स्त्रिया मूर्छित होतात. अशा अर्थाचें वरील पद्य आहे. तसेंच:-
आर्या-
खलरुप भुजंगाचा मारायाचा विचित्र विधि जाणा ॥
एकाचे कानाचा चावा घेतां दुजा मुके प्राणा ॥२॥
श्लोक-
आरोहसी नित्य नळाचिये जरी । संकल्पसोपान-परंपरेवरी ॥
धापा बहू टाकितसे थकून तो । ध्यानें तुझ्या त्वस्वरुपास पावतो ॥३॥
आर्या-तो वीर रुद्र नरवर धारण करि जेधवां धराभार ॥
सामंत राजयांचीं शिरें निरंतरचि वाकलीं फार ॥४॥
करणें असून एकीकडे कृती हो दुजेकडे जेव्हां ॥
एक कराया सजतां विरुद्ध । कृति तरि असंगति तेव्हां ॥५॥
श्लोक-
अपारिजाता वसुधा कराया । केला तसा स्वर्गहि देवराया ! ॥
प्रवृत्त गोत्रोद्धरणास होशी गोत्राचिये तैं दलना करीशी ॥६॥
गद्य-
अरिजात नाहीसें करण्याकरितां कृष्णानें नंदनवनांतून पारिजातक वृक्ष उघडून आणिला, वराहावतारीं समुद्रांत बुडालेली पृथ्वी
वर आणतांना खुरांचे योगानें वराहानें पर्वताचे चूर्ण केलें इत्यादि अर्थ श्लिष्टपदानें दाखविले आहेत.
श्लोक-
खडें तुझ्या वघियले रिपु तत्स्त्रियांचे ॥
झाले विलक्षणचि भूषणसंघ त्यांचे ॥
नेत्रांत कंकण उरावर पत्रवेल ॥
चोलेंद्र सिंव्ह ! तिलकांकित हस्तजाल ॥७॥
गद्य-
यांत "कंकण" व " तिलक" हे दोन शब्द श्लिष्ट आहेत. "कंकण" जलकण अथवा बांगडा. तिलक-टिळा किंवा तिलयुक्त जल.
N/A
References : N/A
Last Updated : February 23, 2018
TOP