अर्थालंकार - अपन्हुति
काव्यास ज्याच्या योगाने शोभा येते त्यास अलंकार असे म्हणतात.
श्लोक-
आरोपिती अन्यगुणासि जेथें । तदीय धर्मां दवडून तेथें ॥
अपन्हुती शुद्ध, न चंद्रमा हें । आकाश-गंगेतिल पद्म आहे ॥१॥
आर्या-
हे स्त्री नव्हे ? प्रतिष्ठा तुमची जरि ईस सोडितां पाणी ॥
"धर्मेचार्थेच" असें वदला कां प्रथम जोडितां पाणी ॥२॥
विराटपर्व.
गद्य-काव्यप्रकाशकार ह्णणतात. उपमेय असत्य व उपमान सत्य असें स्थापणें त्यास अपन्हुति
ह्णणावें.
श्लोक-न हें नभोमंडल वारिराशी । न तारका फेसचि हा तयाशी ॥
न चंद्र हा नावाचे चालताहे । न अंक तो तीवर शीड आहे ॥२॥
चौ.पु.
गद्य-यास तत्वापन्हव रुपक असें काव्यदर्शकार ह्णणतात.
श्लोक-संतापदें यास्तव चंद्रनोहे । रवी ह्णणावा तरि रात्र आहे ॥
हा सागरांतूनि निघोन गेला । आकाश मार्गी वडवाग्नि ठेला ॥३॥
मराठी चौथें पुस्तक.
गद्य-
यास हेत्वपन्हुति अलंकार ह्णणतात.
श्लोक-
हालाहलासि विष मानिति हें असत्य ॥
लक्ष्मीच सत्य विष हें जनवैपरित्य ॥
त्यातें पिऊनि शिव जागृत नित्य राहे ॥
स्पर्शून हीस मधुसूदन झोप लाहे ॥४॥
येथें विषाचे ठायीं विषाचे गुण नाहींत ह्णणून त्यास विष ह्णणणें बरोबर नाहीं, असें दाखवून ते गुण लक्ष्मींत आढळतात तेव्हां तीसच
विष हें नाम योग्य आहे. असें दाखविले आहे. ह्णणून अपन्हुति अलंकार झाला. याप्रमाणेंच.
आर्या-
या स्वर्गी मूर्तिमती तूंचि सुधा जी प्रसिद्ध असुधा ती ॥
न तिच्या पानें जैसें त्वदधर-पानें क्षणांत असु धाती ॥
वनपर्व.
गद्य-
यास पर्यस्तापन्हुति असें ह्णणतात.
श्लोक-
जटानोहे माझा मदन ! बुचडा हें न गरल ॥
गलीं कस्तूरी ही हिमकर शिरीं हा न कमल ॥
न भूती ही आंगी प्रिय-विरह-योगें धवलता ॥
शिवाचे भ्रांतीनें कुसुमशर ! कां मारिशि नतां ॥६॥
येथे कोणीएक विरहिणी स्त्री मदनाचे बाणानें व्यथित होऊन त्यास मी शंकर नाहीं, स्त्री आहे, असें परोपरीनें सांगते आहे. येथें मदनानें भ्रांतीनें बुचडयास जटा मानिलें आहें. कंठीचे कस्तूरीला गरल असें मानिले आहे. मस्तकावरचे कमलाला चंद्र असें मानिलें आहे.
विरहजन्य पांढुरकीला भस्म असें मानिलें आहे. येथें मदनानें खर्या स्वरुपाचा अपन्हव करुन नवीन गुणाचा आरोप केला आहे. ह्णणून हा अलंकार झाला आहे.
गद्य-
हीस कल्पित-भ्रांति -पूर्वाऽपन्हुति असें ह्णणतात. दंडी यास तत्वाख्यानोपमा असें ह्णणतो. त्यानें ह्णटलें आहे.
आर्या-
न कमल मुख हें आहे भृंग न हे नेत्र सत्य असती ते ॥
सादृश्य स्पष्ट जरी तत्वाख्यानोपमा तरी होते ॥७॥
गद्य-साहित्यदर्पणकारांनीं यास निश्चयालंकार ह्नटलें आहे.
श्लोक-
कोणी मानिति अंक या जलधिचा हा पंकसें मानिती ॥
कोणी या मृग मानिती कितिक भू-छाया असें धारिती ॥
जी काळी स्फुटितेंद्र नीलमणिवद्भासे दरीसी जना ॥
रात्रीचा घनदाट जो तमचि हा कुक्षिस्थ हें ये मना ॥८॥
तो मंदराद्रि-बुडिच्या बहु प्रस्तरांहीं ॥
घासिन्नला ह्णणुनिया व्रण-खूण वाही ॥
छाया, ससा, मृग, असे वदतात नीच ॥
त्यांतून एकहि इथें न बसेंच साच ॥९॥
येथें समुद्रमंथनाचे वेळेस जेव्हां मंदराचलाला रवीसारखा समुद्रांत उभा करुन त्यास दोरी बांधून तिनें त्यास पुढें मागें फिरविण्यास देव व दैत्य लागले होते. तेव्हां चंद्राचें अंग दगड लागून खर चटलें असा कवीनें निश्चय करुन छाया, ससा इत्यादि कल्पना खोटया असें मानिलें आहे.
आर्या-
नागरिका उंच किती शेंपुट मागें पुढें पहा रेडा ॥
नहि वेडया गज पोतचि पुच्छन पुढलें हिला वदति शुंडा ॥९॥
गद्य-
हीस संभवद्भांतिपूर्विकापन्हुति असें ह्णणतात.
श्लोक-तडिन्नोहे हे तों चमकत असे सौध-शिखरीं ॥
कुरंगी नेत्रेची कनक-पिवळी हे तनु खरी ॥
अहो आतां वाटें मज न कुमुदाचें विपिनक ॥
विकासे हें तीचें वदन नयनाऽनंद-जनक ॥१०॥
आर्या-सीत्कारातें शिकवी अधरा चावे तनू सरोमांच ॥
करितो नागरिक तुला भेटेका ? सखि न हैम वायूच ॥११॥
आर्या-
सीत्कारातें शिकवी अधरा चावे तनू सरोमांच ॥
करितो नागरिक तुला भेटेका ? सखि न हैम वायूच ॥११॥
गद्य-
हीस छेका पन्हुति ह्णणतात.
श्लोक-
झालीं असें निरखुनी जल-शून्य रानें ॥
तापोनिया बहु दुपार चिया उन्हानें ॥
स्कंधांतरांतुनि दवाग्नि-शिखा-मिषें ते ॥
काढून जभि तरु मागति कीं जलातें ॥१२॥
येथें वणव्यानें झाडांस आग लागली असतां त्यांचे खांद्या खांद्यांतून अग्नीच्या ज्वाला निघूं लागल्या. तें पाहून कवी ह्णणतो कीं या ज्याला नव्हेत, वृक्षांच्या जीभा आहेत; आणि या जीभा बाहेर काढून उन्हांत तापून गेल्यामुळें, व रानें जल रहित झाल्यामुळें, वृक्ष पाणी मागताहेत.
गद्य-
हीस कैतवापन्हुति ह्णणतात.
आर्या-
कथिता उपपति-वार्ता सखी ह्णणोनी पतीस अनुरागें ॥
जाणुनिया तो पति ते " जागी झालें" असें पुढें सांगे ॥१३॥
छेकापन्हुतिची उत्तम उदाहरणें पाहणें असल्यास जोशीबावांची
"राधासखि संवादीं छेकापन्हति हे आइका ॥ रसिकहो काय चतुर बायका ॥"
ही लावणी पहावी.
N/A
References : N/A
Last Updated : February 23, 2018
TOP