अर्थालंकार - परिकर
काव्यास ज्याच्या योगाने शोभा येते त्यास अलंकार असे म्हणतात.
अनुष्टुप्-
अलंकृती परिकर साभिप्राय विशेषणीं ॥
तुमचा ताप-हर्ता हो शशिशेखर शंकर ॥१॥
येथें शशिशेखर हें विशेषण साभिप्राय आहे. कारण चंद्र हा संतापाचा नाश करणारा आहे; आणि शंकरानें अशा चंद्रास मस्तकीं धारण केलें आहे.
श्लोक-
तुझ्य़ा प्रसादें जरि पुष्पबाण । सहाय होतांचि वसंत जाण ॥
हरीन मी सत्य पिनाकिधैर्य । माझे पुढें तुच्छचि धन्विवर्य ॥२॥
येथें पुष्पबाण हें मदनाचें विशेषण व पिनाकि हें शंकराचें विशेषण.
ही दोन्हीं विशेषने साभिप्राय आहेत. याप्रमाणें खालींही:-
आर्या-
घाणीचें भांडारचि अन्नादि कृतोपकार नाश करी ॥
क्षणभंगुर जरि तनु ही तीसाठीं मूर्ख पाप बहुत करी ॥३॥
श्लोक-
केला मी नच वेदविस्तर न मी वल्मीक-जन्मा असें ॥
नाभीपासुन जन्मलों न हरिच्या भाष्याहि केलें नसे ॥
चित्रार्थाहि बृहत्कथा न कथिल्या झालों न वाणीपती ॥
देवा त्वद्गुणवर्णनीं तरि कशी हो योग्य माझी मती ॥४॥
येथें मी व्यास नव्हे, वाल्मीकि नव्हे, ब्रह्मदेव नव्हे, शेष नव्हे, इत्यादि अर्थाचे विशेषणांनीं मीं तुझें गुणवर्णन करण्यास समर्थ नाहीं असे दर्शविलें आहे.
त्या कामिनी हसितवत्सित-कुंद यांहीं ॥
बागा सुशोभित मनोहर सर्वदाही ॥
निर्वृ राग मुनिच्याही मना हरीती ॥
रागें मलीमस मनेंहि तसेच रीती ॥५॥
त्यजुनि निज पुजीतो जो दुजा देवतेला ॥
उभय सुख मुके तो पाप लागे तयाला ॥
विपुलतर-वनांनीं युक्त गोवर्धनाला ॥
त्यजुन सुरपतीशीं काय कर्तव्य बोला ॥६॥
गद्य-
येथें इंद्राकरितां प्रतिवार्षिक यज्ञ करण्यास नंद उद्युक्त झाला असतां श्री कृष्णांनीं त्यास मना करुन गोवर्धनाचीच पूजा करावयास
सांगितलें आहे. ॥विपुलतर वनांनीं युक्त । हें गोवर्धनाचें साभिप्राय विशेषण आहे.
आर्या-
टळतां अवधि ज्वलनीं न चुकेलचि तो स्वकाय हो माया ॥
नश्वर-वपुची अवितथ-संधा सूज्ञास काय हो माया ॥७॥
(सीतारामायण.)
N/A
References : N/A
Last Updated : February 23, 2018
TOP