अर्थालंकार - विभावना
काव्यास ज्याच्या योगाने शोभा येते त्यास अलंकार असे म्हणतात.
आर्या-
कारणाविना जरी हो कार्य तरी ती विभावना होते ॥
दिसती चरण तियेचे लाखेवाचून तांबडे हो ते ॥१॥
श्लोक-पानेंविहीन कलहंसहि मत्त जेथें ॥
सम्मार्जनारहित अंबर साफ तेथें ॥
पाणी प्रसादनविहीनचि सूक्ष्म वाहे ।
येणेंपरी जग मनोहर भासताहे ॥२॥
आर्या-ते राजसुता सीता सेवितसे प्रेमयुक्त कमलाक्षा ॥
जीचे वनसंचारें दिसती पद रक्त जरि नसे लाक्षा ॥३॥
मंत्ररामायण.
श्लोक-
जे काकती भूपभयें पळाले ।
ते वीर विंध्याद्रिगुहा रिघाले ॥
रात्रीविनाही तम होय त्यांना ।
त्यां वासरीं तेजहि उद्भवेना ॥४॥
सुरुचिर-तनुची तैं घालितां दिव्य वेणी ।
सुरभि नखसमूहें भासला भूपपाणी ॥
कुसुमतति लतेची तोडिलीयाहि जैसा ॥
विपुल मधुपसंगें शोभतो वेल तैसा ॥५॥
आर्या-असमग्र हेतु असतां कार्य घडे तरि विभावन होती ॥
तिखट कठिण नसुनी त्या अस्त्रांनी जिंकितो मदन जगती ॥६॥
गद्य-
दंडीनें हीस विशेषोक्ति असें ह्णटलें आहे.
आर्या-
उद्यान वायु उडवी रेणू चंपक रसाल वृक्षांचे ॥
नयनां न लागतांही पाणी ते आणितात पथिकाचे ॥७॥
असतां प्रतिबंधक जरि कार्योप्तत्ती विभावना तरि ते ॥
असिरुप सर्प राजा तुजा डसे मात्र तो नरेंद्रांतें ॥८॥
राजा प्रतापरुपी तपन पहा हा विचित्र कीं तपतो ॥
छत्रविहीनां सोडुन छत्रसमेतांस ताप बहु देतो ॥९॥
श्लोक-
अकारणापासुन कार्य जेव्हां । विभावनालंकृति जाण तेव्हां ॥
शंखातुनी हा उदयास आला । वीणाध्वनी अद्भुत हें मनाला ॥१०॥
शंखांतून वीणेसारिखा ध्वनि येणार नाहीं; आला असें दर्शविलें ह्णणून विभावनालंकार झाला. शंखासारिखा जो कामिनीचा कंठा
त्यांतून वीणेसारिखा ध्वनि कां निघणार नाहीं ? अर्थात् निघण्याचा संभव आहे ह्णणून आला ह्णणण्यास हरकत येणार नाहीं.
आर्या-
ति पुष्पापासुन हा चंदनसम पवन मधुर वाहतसे ॥
नील कमलयुगुलांतुन निघति शिलीमुख विचित्र हेंच असें ॥११॥
असतां विरुद्ध त्यांतुन कार्योप्तत्ती विभावना तरि ती ॥
शीतांशुकिरण हा ! हा ! सुतनूला बहुतताप देताती ॥१२॥
श्लोक-
माला पुष्पमयी विलासमयीं वक्षस्थळीं लोळली ॥
कांतेच्या कुचकुंकुमें करुनिया आलिंगनीं घोळली ॥
या भाग्येंचि जरी प्रियाहि उतरे बाव्हंतरीं राहिली ॥
ती शीता परि तापदा प्रकट त्या बाणासुरें पाहिली ॥१३॥
बृहद्दशम.
उदित-तनय-भानू होय जेव्हां नृपाला ॥
कुवलय खुलतें हो ! तेंवि नक्षत्रमाला ॥
मुकुलितचि बहू हो तेधवां सर्व होती ॥
परनृपतनयांचीं पाणि-पद्में अहो तीं ॥१४॥
सूर्य उगवला असतां कुवलय खुलणें व नक्षत्रें उगवणें व पद्में मिटणें ह्या गोष्टी कधींही होऊं नयेत, त्या झाल्या ह्णणून विभावनालंकार
झाला; परंतु नृपसुत हाच सूर्य उगवला असतां कुवलय (भूमंडल) खुलणें व नक्षत्रमाला (क्षत्रिय) न खुलणें व परनृपतनयांचीं हस्तरुपपद्में मिटणें ह्या गोष्टी होणें साहजिक आहे. ह्णणून विरोधपरिहार झाला.
आर्या-
कार्यापासुन कारण उपजे जरि ते विभावना तरिच ॥
कर कल्पतरुपासून झाला यशरुप जलनिधी साच ॥१५॥
उगवे लता गिरीवर परि नुगवे हो लतेवरी शिखरी ॥
झालें हें विपरितचि कनकलतेवर सुरम्य दोन गिरी ॥१६॥
श्लोक (१५) यांत कल्पतरुपासून समुद्र उत्पन्न झाला हें दर्शविलें आहे. येथें कार्यापासून कारणोत्पात्ते सांगितली आहे.
श्लोक (१६) यांत स्त्रीरुपी कनकलतेचे उरावर दोन स्तनरुपी गिरी उद्भवले हें दाखविले आहे.
N/A
References : N/A
Last Updated : February 23, 2018
TOP