अर्थालंकार - अप्रस्तुतप्रशंसा
काव्यास ज्याच्या योगाने शोभा येते त्यास अलंकार असे म्हणतात.
आर्या-
प्रस्तुतपर अप्रस्तुत वर्णन अप्रस्तुतप्रशंसा ती ॥
इंद्राहून दुज्या जो मागे ना तो शंकुत होय कृती ॥१॥
गद्य-
येथें हलक्या लोकांपाशीं याचना करुं नये, असा विचार करुन मागें परतलेल्या मानी पुरुषाकडे पाहून कोणीं चतुरानें साक्षात्
त्याची स्तुति न करितां चातक पक्षाची स्तुति केली आहे. अप्रस्तुतावरुन प्रस्तुताचें ज्ञान होण्यास त्या दोघांमध्यें, सारुप्य -संबंध,
अथवा सामान्यविशेषभावसंबंध अथवा कार्य-कारण-भाव-संबंध, यांपैकीं कोणचा तरी संबंध असला पाहिजे. वरील उदाहरण सारु-
प्यनिबंधनेचें झालें.
याप्रमाणेंच.
श्लोक-
बांधोन कृत्रिम सटा जरि अंसदेशीं ॥
सिव्हासनीं बसविलें शुनकाधमाशी ॥
मत्तेभकुंभतटपाटनलंपटाची ॥
तो गर्जना करिल केंवि मृगाधिपाची ॥२॥
आर्या-
अंतरिं छिद्रें बहुतचि कंटक बाहेर बहुत ज्या असती ॥
त्या अंबुजदेठाचे गुण-गण भंगुर कसे बरे होती ॥३॥
गद्य-
दुसरे श्लोकांत कृत्रिमवेष व्यवहारानेंच मात्र निंदा करुन सुचविलें आहे. तिसरे श्लोकांत कमलाचे देठाचे बाह्यार्थी वर्णन करुन त्यांत
खल जागृत असतां कुटुंबांतील पुत्रबंधुगणाशीं भांडणार्या "पुरुषाचें वर्णन सुचविलें आहे. तसेंच:-
आर्या-
द्वारीं मृगपति - हस्तांतून अहो वीरराय जी मुक्ता ॥
ती सेविजेल इतरें सिंहावाचून काय जी मुक्ता ॥४॥
आदिपर्व.
सामान्य निबंधनेचीं उदाहरणें.
आर्या-
सक्रोध शत्रुचें जो वैर करोनी उदास नर होतो ॥
तृणराशीवर अग्नी टाकुन वार्याकडे निजे हो तो ॥५॥
येथें पूर्वीच शिशुपालाचें मनांत कृष्णाविषयीं राग आला होता, तो पुढें ऋक्मिणीहरणाचे वेळेस ज्यास्ती झाला. ह्णणून अशा शत्रूची
उपेक्षा करणें योग्य नाहीं असें विशेष सांगावयाचें असतां तें सोडून त्याचे ऐवजीं ही सामान्य गोष्ट सांगितली आहे.
आर्या-
मित्रत्व हेमरेखा यांमध्यें उंच नीच समजाया ॥
असते परोक्षसंज्ञित निकषशिला हो कसास लावाया ॥६॥
जर तूं माझे देखत,तसें मागें माझें हित करशील तरच तूं उत्तम मित्र, हें विशेष सांगावयाचें असतां सामान्य सांगितलें आहे.
विशेष निबंधनेची उदाहरणें:-
श्लोक-
अंकावरी बसविलें ह्णणूनी मृगाला ॥
तो ओषधीश मृगलांछन सत्य झाला ॥
जो घालवी हरिण वर्ग वनांतरातें ॥
त्या केसरीस मृगयूथप बोलिजेतें ॥७॥
गद्य-
येथें क्रूर जो पुरुष तोच कीर्तिमान् होतो, मृदुपणानें कीर्ति मिळत नाहीं, हें सामान्य सांगावयाचें असतां विशेष सांगितले आहे.
कारणनिबंधना:-
श्लोक-
नभ नीलिम युक्त वाटतें । बिल केलें शशिमंडलींच तें ॥
विधिनें मग सार काढिलें । दमयंतीवदनास निर्मिले ॥८॥
येथें दमयंतीचे मुखाचें लोकोत्तर सौंदर्य वर्णन करावयाचें असतां तें मुख निर्माण करण्याकरितां ब्रह्मदेवानें चंद्रमंडलाचें सार काढिलें हें
सांगितलें आहे. कार्यनिबंधना-
श्लोक-
प्रक्षालितां पदनखें जलमिश्र झाले ॥
तत्कांतिलेश-कण ते जलधींत गेले ॥
ते सर्व एकवटुनी नवनीत झाले ॥
क्षीराब्धिमंथनमुखीं शशिसे निघालें ॥९॥
हंसांनीं गमनास पाहुन हिच्या गर्वा अधीं सोडणें ॥
वाड्माधुर्याचि कोकिलें परिसुनी मौनव्रती राहणें ॥
अंगाची मृदुता विलोकुन गमे पाषाणशी मालती ॥
कांती देखुनि फार काय कमला काषाय घेवोच ती ॥१०॥
लज्जा मनीं होय जरी पशूंच्या । पाहून नि:संशय पार्वतीच्या ॥
केशास, गाई वनिच्या करोत । प्रीति स्वकेशीं कमती कमीत ॥११॥
गद्य-
श्लोक आठ यांत भगवंताच्या नखाचे कांतीचा उत्कर्ष दाखविण्याकरितां त्याचे प्रक्षालनजलापासून उत्पन्न झालेले चंद्ररुपकांतीचें वर्णन केलें आहे. याप्रमाणेंच नवव्या व दाहव्या श्लोकांत संभाव्यमान कार्याचें वर्णन केले आहे. खालील श्लोकांत कारणनिबंधना व कार्यनिबंधना हीं दोन दाखविलीं आहेत.
श्लोक-
कालिंदी ! बोल कुंभोद्भव ! उदधिच मी; नाम घेशी कशाला ॥
शत्रूचें ? नर्मदा मी; मजसि सवतीचें नाम हो कासयाला ? ॥
ह्या मालिन्या अगे तूं धरिशि मग कसें ? प्रियसखि ! नृपती कोपले कुतंतलाचे ॥१२॥
गद्य-
यांत मालवी स्त्रियांना रडण्याचे कारण काय ? हें पुसलें असतां कुतंतलपती रागावले हें कारण सांगितले ह्नणून येथें कारणनिबंधना झाली. मालवदेशावर स्वारी केल्यावर त्यानें तेथील लोकांचा नाश केला काय ? असा प्रश्न केला असतां त्याचे वधानंतर होणार जो नर्मदा व समुद्र यांमधील संवाद तो कार्यरुपानें दाखविला, ह्णणून येथें कार्यनिबंधना झाली.
पहिला प्रश्न शाब्द, व दुसरा आर्थ, एवढाच काय तो भेद.
या अलंकारास कोणी अन्योक्ति असें म्हणतात.
N/A
References : N/A
Last Updated : February 23, 2018
TOP