अर्थालंकार - पर्याय
काव्यास ज्याच्या योगाने शोभा येते त्यास अलंकार असे म्हणतात.
श्लोक-
क्रमानें जरी एक वस्तू अनेकीं । रहाते तरी नाम पर्याय लोकीं ॥
त्यजोनी सरोजा शशीलागि जाते । अहो कामिनी वाम-वक्रोपमाते ॥१॥
हीं उत्तरोत्तर विशेष अशीं ठिकाणें ।
घ्याया तुला कथियलें मज सांग कोणें ॥
हालाहला ? जलधिमाजि, पुढें शिवाच्या ।
कंठांत, आज वसलासि मुखीं खलाच्या ॥२॥
श्रोणी हीचे त्यजिति तनुता सेविते त्या कटी ती ।
पादाब्जांनीं चपल गमनें सोडितां तेत्र घेती ॥
घेई छाती कुच-सचिवता एकटें वक्र राहें ।
त्वद्गात्रांचे गुण बदलती यौवनें यापरी हे ॥३॥
फिरोन पृथ्वी बहुधाच सारी । बैसोन छाये श्रम ते निवारी ॥
होतां बहू तीव्रचि उष्णरश्मी । थंडी जलामाजिच जाय ग्रीष्मीं ॥४॥
आर्या-बिंबोष्ठीं जो पूर्वी राग तुझा सुंदरी दिसत होता ॥
मृगनेत्रे तो तुझिये हृदयामध्यें दिसे मला आतां ॥५॥
एके ठायीं जेव्हां अनेक राहे तयाहि पर्याय ॥
आज दिसें पुलिन तिथें पूर्वी वाहें जिथे बहुत तोय ॥६॥
श्लोक-न हा होता पूर्वी प्रथम अमुचा देह दुसरा ।
पुढें तूं झालासी प्रियतमचि आह्मी प्रियकरा ॥
पती तूं पत्नी ह्या कितितरि सख्या फेर पडला ।
गमें हें प्राणांचें कुलिश-कठिणांचे फल मला ॥७॥
नृत्यास टाकिति अशा शिखिना त्यजोनी ।
हंसाकडे मदन ये रत जेहि गानीं ॥
सोडूनिया कुटज-अर्जुन-पादपाली ।
सप्तच्छदास कुसुमोद्गमकांति आली ॥८॥
N/A
References : N/A
Last Updated : February 23, 2018
TOP