अर्थालंकार - स्मरण
काव्यास ज्याच्या योगाने शोभा येते त्यास अलंकार असे म्हणतात.
आर्या-
स्मारक पदार्थ देखुनि अनुभवित - स्मृति जरी स्मरण जाण ॥
कांतेच्या वदनाचें सरसिज देतें घडोघडीं स्मरण ॥१॥
एखादा स्मरण देणारा पदार्थ पाहिल्याबरोबर अनुभव घेतलेल्या
पादार्थाची स्मृति झाली असतां हा अलंकार होतो.
जेव्हां जेव्हां कमल पहावें तेव्हां तेव्हां तें कमलास्या जी प्रिया तिचे
मुखाचें स्मरण देतें. अशा ठिकाणीं हा अलंकार समजावा.
याप्रमाणेच: -
दो हातीं धरुनि जयीं मातेच्या स्तन - मुखा अधर लावी ॥
शंख स्मृतिनें पुलकित हो हरितनु ती सदैव वंदावी ॥२॥
श्लोक -
देवांसही विस्मय वाटवी जे । एक्या करीं अंबुज एक साजे ॥
देखोन पाण्यांतुन तीस येतांक्षीराब्धि-मंथ-स्मृति हो अनंता ॥३॥
सर्वा देवांस आश्चर्य वाटविणारी व जिचें एके हातांत एक कमल
आहे अशा त्या स्त्रीस पाण्यांतून बाहेर निघतांना पाहून कृष्णास
लक्ष्मीच येते कीं काय असें वाटून क्षीरसागर-मंथनाचें स्मरण झालें.
आर्या-
अलि-पुंज देखतां मज सीतेचे केश लक्ष्मणा स्मरती ॥
तत्कबरीसम हे शिखि - पिच्छ - कलाप स्वमानसीं भरती ॥४॥
मंत्ररामायण.
श्लोक-
सौमित्र ! प्रिये ! बैस बा तरुतळीं चंडांशु हा नापद ॥
रात्रीचा रवि कायसा रघुपते ! हा चंद्र कांतिप्रद ॥
वत्सा हें तुजला कसें समजलें ? घेई कुरंगा न कीं ॥
हा ! कोठे असशी ? कुरंगनयने ! चंद्रानने जानकी ॥५॥
येथें लक्ष्मणानें कुरंगाचें नांव घेतल्याबरोबर रामास कुरंग-नयना
जी सीता तिचें स्मरण झालें आहे.
आर्या-
अरि - हरिपासून सुटतां करि करि-भूपति पलायन त्वरित ॥
स्मरलें सुरांसि तेव्हां कालयवन-भीत-शौरिचें चरित ॥६॥
कर्णपर्व.
N/A
References : N/A
Last Updated : February 23, 2018
TOP