अर्थालंकार - उल्लेख
काव्यास ज्याच्या योगाने शोभा येते त्यास अलंकार असे म्हणतात.
आर्या-
बहुतानां बहुतांपरि वाटे एकच पदार्थ माना ॥
उल्लेख, काम अबलां, कल्पतरु याचकां, यम अरींना ॥१॥
अनुष्टुप्-
जगत्पाल असा वृद्ध । स्त्रियांहीं, तरुणीं जनीं ॥
काम, बाल मुलींनीं तो । देखिला कृष्ण कौतुकें ॥२॥
गद्य-
यामध्यें मथुरेंत प्रवेश करितांना कृष्णास जेव्हां पौरांनी पाहिलें
तेव्हां तो कोणकोणांस कसाकसा दिसला, हें वर्नन केलें आहे.
जेव्हां एका पुरुषास निरनिराळे गुणाचे योगानें एखादा पुरुष निरनिराळ्या
पुरुषासारखा वाटतो तेव्हांही हा अलंकार होतो. जसें: -
वाक्पटुलीं सुरगुरु । कीर्तीमध्येंहि अर्जुन ॥
चापविद्येंत निपुण भीष्म कीं जान्हवीसुत ॥३॥
गद्य-
यास काव्यादर्शकारांनीं हेतुरुपक असा रुपकाचा भेद
मानिला आहे.
आर्या-
अकृश कुचीं, कृश, मध्यें, आयत नेत्रीं, नितंबभागीं जी ॥
पृथु, आरक्तहि अधरीं, दुर्गाहो मन्मनीं प्रगट आजी ॥४॥
येथें शरीराचे निरनिराळे अवयवाचे संबंधानें निरनिराळे गुणांनी
युक्त पार्वती आहे असे दाखविलें आहे. याचप्रमाणें: -
श्लोक -
भासे विलोल मदिरालस-लोचनांत ॥
गांलिहि पांडु, कठिन स्तन मंडलांत ॥
मध्यें गभीर, जघनांतहि पुष्ट भारी ॥
राहे मनोभव वधूंत अशा प्रकारीं ॥५॥
मल्ला वज्र गमे, नरानृपगमें, काम स्वयें स्त्रीजना ॥
गोपां आप्त, खलां नृप प्रभु, शिशू मातापित्यांच्या मना ॥
कंसा मृत्यू अशक्त पामर जना संतास तत्वामृत ॥
श्रीशेषासन यादवा हरि दिसे रंगांत रामान्वित ॥६॥
वामन.
N/A
References : N/A
Last Updated : February 23, 2018
TOP