अर्थालंकार - उल्लास
काव्यास ज्याच्या योगाने शोभा येते त्यास अलंकार असे म्हणतात.
आर्या-
एकाचे गुणदोषहि अन्या होतां तयास उल्लास ॥
साध्वी स्नानें पावन करील इच्छा अशीच गंगेस ॥१॥
जेथें एकाचे गुणानें दुसर्याचे गुण, दोषानें दोष, गुणानें दोष, व दोषानें गुण, वर्णिलें जातात तेथें हा अलंकार होतो.येथें साध्वीने स्नान केलें असतां तिचा पवित्रपणाचा गुण माझेमध्यें येईल अशी इच्छा नेहमी गंगेस असते. यांत एकाचा गुण दुसर्यांत येईल असें दर्शविलें आहे.
आर्या-
स्वारी तुझी निघाली ऐकुनि निंदिति रिपुस्त्रिया विधिला ॥
स्तनकाठिण्य निघावें वांच्छिति ते यावया चरनयुगुलां ॥२॥
दुर्भाग्य तें धनाचें ज्या अर्थी आश्रयी न साधूला ॥
भूपाल सेवकांना आयुष्यचि लाभ थोर जाणितला ॥३॥
जो हा रथ संक्षोभें दयितांसें घांसिला मदीयांस ॥
एकचि कृती मदंगीं बाकीचा भार मात्र भूमीस ॥४॥
येथें नायिकेंत सौंदर्य हा गुण वसत असल्या कारणानें तिच्या खांद्यानें घासलेला जो माझा खांदा तो कृतार्थ झाला हें दाखविलें आहे.
श्लोक-
लोकानंदन चंदनद्रुम सख्या राहूं नको या वनीं ।
वेळूंनीं परुषीं असार हृदयीं हे व्यापिली मेदिनी ॥
यांचे घर्षण जालिया निघतसे दावाग्नि तेथें सदा ।
वेळूंचींच कुळें न जाळित बसे जाळी वना तो तदा ॥५॥
दानार्थि जे मधुप त्या श्रुतिताडनानें ।
धि:कारिलें जरि गजें मद-नष्ट धीनें ॥
त्याचीच गंड-युग-मंडन-हानि पाहे ।
जातील भृंग फुलल्या कमलांत बा हे ॥६॥
हुंगोनी जरि चुंबिलेजरि पुन्हां चाटोनिया चाविलें ।
टाकोनी दिधलें तुला अरसिकें त्वां पाहिजे साहिलें ॥
सद्रत्ना तरि हेंच जाण बरवें ज्या तूजला वानरें ।
अंत:सार पहावयास दगडें केलें न जों चूर्ण रे ॥७॥
येथें वानराच्या चपलपणाच्या दोषानें रत्नांचें चूर्ण झालें नाहीं हा गुण दाखविला आहे.
N/A
References : N/A
Last Updated : February 23, 2018
TOP