धावा पाव सावळ्या विठोबा मनी का धरली अढी अनाथ मी स्मरले उतरा पहिल्या थडी ॥धृ॥
एकनाथाघरी पाणी वाहिले गंगेच्या कावडी विठोबा गंगेच्या कावडी कबीराचे घरी शेले विणुनी त्याची घालसी घडी ॥१॥
सावळ्याची भाजी खुडीशी त्यासी बांधीसी जुडी सजन कसाया मांस विकोनी त्याची लावसी धडी ॥२॥
दामाची पंताचा महार झाला तातडी विठोबा नोकर झाला तातडी पायी वहाणा हाती काठी खांद्यावर घोंगडी ॥३॥
जनाबाईचे लुगडे धुतले चंद्रभागेच्या तीरी नरसिंह मेहताची हुंडी पटविली त्याचा झाला सौंगडी ॥४॥
चोख्यामेळ्याच्या घरी जाऊनी ओढी कातडी त्याची स्त्री बहू हाका मारी कोठे दिधली धडी ॥५॥
गजेंद्राचा धावा ऎकुनी वेगे घालसी उडी अर्जून रथ सारथी होऊनी भक्तांची कामे करी आवडी ॥६॥
म्हणे नामा ऎसे विठोबा त्यांच्या चरणी माथा ठेवी घडोघडी ॥