सदगुरु राये कृपा केली मज परी नाही घडली सेवा काही ॥धृ॥
सापडविली वाट जाता गंगास्नाना । मस्तकी तो जाणा ठेविला कर ॥१॥
भोजन मागता तुप पावशेर पडला विसर स्वप्नामाजी ।
काही न कळे उपजला अंतराय, म्हणोनिया काय त्वरा झाली ॥२॥
राघव चैतन्य केशव चैतन्य । सांगितली खुण मालकीची ॥३॥
बाबाजी आपुले सांगितले नाम मंत्र दिला राम कृष्ण हरी ॥४॥
माघ शुद्ध दशमी पाहुनी गुरुवार केला अंगीकार तुका म्हणे ॥५॥