कृष्णा नदीचे निर्मळ पाणी पिके जोंधळा मोत्यावाणी । ओढ्याकाठीची आंबाराई लावली ग ।
माझ्या माहेरी सुखाची सावली ॥धृ॥१॥
माझ्या अंगणात गोठाभर गाई । गाई बैलाची गणतीच नाही । जाई शेवंती सोन्यावाणी पिवळी ग ॥२॥
जशी आकाशाची जगावर छाया माझ्या आईची माझ्यावर माया । प्रिती सांडीती पावला पावली ग ॥३॥
जसा शुक्राचा तारा नभी । तशी शेताच्या बांधासा उभी माझ्या वडिलांची मूर्ती सावळी ग ॥४॥
पूर्व जन्मीचे सुकृत केले सुख आता बहु वाटीला आले । माझ्या नवसाला अंबाबाई पावली ग ॥५॥
ही दौलत सोन्याहून पिवळी ग माझ्या माहेरी सुखाची सावली ॥६॥