झाले मी बावरी आवरी बांसरी । घागर राहीना डोईवरी ॥धृ॥
नाही चारा गाईवासरा । अंगणात पडला सारा पसारा ।
दिवस किती तरी आला मध्यावरी ॥१॥
स्वयंपाकाला झाला उशीर । घरात नाही पाणी तीळभर ।
झारी राहिली घरी चुंबळ विहीरीवरी, ऐकूनी मुरलीचा ध्वनी ।
चित्त लागेना माझ्या मनी । घरात नाही कुणी मुले रडतात सारी ॥२॥
गंगा जमुना गौळण गौरी । गोपीना हाका मारी ।
भानु चरणावरी मन कृपाकरी घागर राहीना डोईवरीं ॥३॥