यमुनेच्या तीरी काल पाहिला हरी । कान्हा वाजवितो बासरी ॥धृ॥
घागर घेऊनी पाणियासी जाता । येतां जाता आम्हा अडविता ।
आमच्या शीरी घडा याने मारिला खडा । याने केली आमची मस्करी ॥१॥
दही दुध घेऊनी गवळ्याच्या नारी । जात होत्या मथुरे बाजारी ।
त्यांचा भरला घडा याने मारीला खडा याने केली आमची मस्करी ॥२॥
यशोदा धुंडले गोकुळ नगरी । अवचित पाहिला राधिकेच्या घरी ।
राधिकेच्या घरी हरी पलंगावरी । पाहून राधा झाली घाबरी ॥३॥
जनी म्हणे बा श्रीहरी । भोग भोगिले बाळ ब्रह्मचारी ।
जनी म्हणे देवा खुप केला तुम्ही असुन ब्रह्माचारी ॥४॥